Ticker

6/Breaking/ticker-posts

१५ फेब्रुवारीला मी पत्रकारांशी बोललो होतो, पण..

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप खरे की खोटे हे ठरविण्यावरून सत्ताधारी महाविकास आघाडी व भाजपच्या नेत्यांमध्ये दावे-प्रतिदावे सुरूच आहेत. राष्ट्रवादी व भाजपच्या परस्परविरोधी दाव्यानंतर खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख आपल्या बचावासाठी पुढं आले आहेत. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप करताना देशमुख आणि एसीपी पाटील यांच्यात भेट झाल्याचे सांगितले होते. या भेटीत देशमुख यांनी पाटील यांना कलेक्शनचे टार्गेट दिल्याचं परमबीर सिंग यांनी म्हटलं होतं. त्यासाठी पाटील यांच्यासोबत झालेल्या स्वत:च्या संभाषणाच्या व्हॉट्सअॅप चॅटचा पुरावा सिंग यांनी दिला होता. त्यात १६ मार्च ही तारीख नमूद करण्यात आली होती. मात्र, ५ ते १५ फेब्रुवारी दरम्यान अनिल देशमुख रुग्णालयात होते. त्यानंतर ते २७ फेब्रुवारीपर्यंत ते होम क्वारंटाइन होते, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीतील पत्रकार परिषदेत सांगितलं.


पवार यांच्या दाव्यानंतर भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी १५ फेब्रुवारी झालेल्या अनिल देशमुख यांच्या पत्रकार परिषदेचं ट्वीट केलं. त्याचाच आधार घेत फडणवीसांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर हल्ला चढवला. त्यानंतर स्वत: देशमुख यांनी पुढं येऊन या संदर्भात खुलासा केला आहे व परमबीर यांचे आरोप खोडून काढले आहेत.

१५ फेब्रुवारीला अनिल देशमुख खरंचं क्वारंटाइन होते का?

' कोविडची लागण झाल्यामुळं ५ ते १५ फेब्रुवारी दरम्यान मी अॅलेक्सिस रुग्णालयात होतो. तिथून १५ फेब्रुवारीला डिस्चार्ज झाला तेव्हा हॉस्पिटलच्या गेटवर अनेक पत्रकार उभे होते. त्यांना काही प्रश्न विचारायचे होते. नुकताच कोविडमधून बाहेर पडल्यामुळं माझ्या अंगात त्राण नव्हता. त्यामुळं गेटवरच खुर्चीवर बसलो आणि काही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्यानंतर मी होम क्वारंटाइन झालो. १५ ते २७ फेब्रुवारी पर्यंत मी होम क्वारंटाइन होतो. २८ फेब्रुवारीला पहिल्यांदा घराबाहेर आलो,' असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. त्यामुळं परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत संभ्रम कायम आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या