Ticker

6/Breaking/ticker-posts

'शिवसेनेचा वाघ पिंजऱ्यात अडकलाय...!'

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

नांदेड: 'शिवसेनेचा वाघ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंजऱ्यात अडकला आहे आणि त्यामुळेच मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मवाळ भूमिका घ्यावी लागत आहे', असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी लगावला आहे. राज्यात सत्तेसाठी तीन पक्ष एकत्र आले असले तरी त्यांच्यात अनेक मुद्द्यांवरून वाद असून हे सरकार फार काळ टिकणार नाही, असेही आठवले यांनी पुन्हा एकदा सांगितले.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. विरोधी पक्षाच्या रेट्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा लागला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांकडे बोट दाखवत भाजपकडून त्यांच्याही राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. याबाबत रामदास आठवले यांनी आज प्रथमच भाष्य केले.

राज्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचं सरकार आहे. आतापर्यंत दोन पक्षांतील मंत्र्यांची प्रकरणं बाहेर आली आहेत. आता तिसऱ्या पक्षातील प्रकरणंही लवकर बाहेर येतील, असा दावा आठवले यांनी केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे शूटिंग आणि प्रदर्शन रोखण्याचा इशारा दिला आहे. त्याचा पुन्हा एकदा निषेध करतानाच काँग्रसने असा प्रयत्न केल्यास रिपब्लिकन पक्ष हा प्रयत्न हाणून पाडेल व अमिताभ व अक्षयचे संरक्षण करेल, असे आठवले म्हणाले.

दरम्यान, नांदेडमधील लोहा तालुक्यातील शिवनी जामगा या गावात बौद्ध कुटुंबावर सामूहिक हल्ला करण्यात आला असून आठवले यांनी आज घटनास्थळी भेट देऊन पीडितांची विचारपूस केली. यावेळी राज्य सरकार दलितांवरील हल्ले रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत महाराष्ट्रात दलितांवर वाढत असलेले हल्ले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थांबवावेत, अशी मागणी आठवले यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या