Ticker

6/Breaking/ticker-posts

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; दहावी, बारावीच्या परीक्षेला अर्धा तास अधिक वेळ

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई:-दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ मिळणार आहे. गेले वर्षभर विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला आहे. त्यामुळे त्यांना अर्ध्या तासाचा वेळ वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षा आता साडे तीन तासांची असणार आहे. परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा येत्या एप्रिल अखेर पासून सुरू होणार आहेत. राज्यात करोना संक्रमणग्रस्तांची संख्या वाढत असल्याने या परीक्षा ऑनलाइन होणार का अशी चर्चा होती. त्याला वर्षा गायकवाड यांनी विराम दिला आहे. महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती पाहता परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्याव्या लागणार आहेत, मात्र विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा केंद्र असणार आहे, असे गायकवाड यांनी सांगितले. शिवाय विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीटाच्या आधारे विद्यार्थी आणि पालक यांना लोकल मुभा देण्यात येणार आहे.

परीक्षा कधी?
दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल २०२१ ते २१ मे २०२१ या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.

परीक्षेची वेळ
दरवर्षी ८० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी तीन तासांचा अवधी दिला जातो. परंतु यावर्षी विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे ८० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी ३० मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. ४० व ५० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा प्रत्येक घड्याळी तासासाठी २० मिनिटांची अतिरिक्त वेळ असेल.

पासिंग गुणांमध्ये कोणताही बदल नाही
करोना काळ असल्याने विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे निकष बदलले जातील का अशी चर्चा होती. मात्र ही शक्यता शिक्षणमंत्री गायकवाड यांनी स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. पासिंग गुणांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही असे त्यांनी सांगितले.

परीक्षा हुकल्यास जूनमध्ये पुन्हा देता येणार
एखाद्या विद्यार्थ्यामध्ये करोनाची लक्षण आढळली किंवा लॉकडाऊन, कंटेन्मेंट झोन, संचारबंदीमुळे परीक्षा देता आली नाही तर अशा विद्यार्थ्यांची जून महिन्यात विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे.

प्रात्यक्षिक परीक्षा लेखी परीक्षांनंतर
दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा कोविड-१९ परिस्थितीमुळे लेखन कार्य म्हणजेच असाइनमेंट पद्धतीने घेण्यात येतील. या असाइनमेंट विद्यार्थ्यांनी २१ मे ते १० जून या कालावधीत सादर कराव्यात.

बारावीच्या लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा २२ मे ते १० जून २०२१ या कालावधीत होतील. बारावी विज्ञान शाखेची प्रात्यक्षिक परीक्षा पाच ते सहा प्रात्यक्षिकांवरच होणार. विद्यार्थ्यांना पाच प्रयोग शिकवणार आणि त्यावर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे.

कला / वाणिज्य / व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेनंतर १५ दिवसांत असाइनमेंट सादर करावेत.
असाइनमेंट सादर करण्याच्या कालावधीत विद्यार्थ्यांना किंवा कुटुंबातील व्यक्तींना करोनाची लागण झाल्यास किंवा कंटेन्मेंट झोन, संचारबंदी असल्यास असाइनमेंट सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ द्यावी.

पुरवणी परीक्षा
बोर्डामार्फत आयोजित केली जाणारी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट महिन्यात घेण्यात येईल. ही परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी आणि ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या