Ticker

6/Breaking/ticker-posts

शेतकऱ्यांचं 'लाल वादळ' मुंबईत धडकलं !

  

मुंबई : अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चाचं वादळ काल रात्री अखेर मुंबईत पोहोचलं आहे. या मोर्चामध्ये ट्रॅक्टर, जीप इत्यादी वाहनांसह हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. आज, 25 जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर धडकणार आहे. केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 60 दिवसांपासून दिल्लींच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील शेतकरी मोठ्या संख्येने या महामोर्चात सहभागी झालेले आहेत.

            या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आझाद मैदानात शेतकऱ्यांचे तीन दिवसांचे धरणे आंदोलन असणार आहे. हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले असून हे लाल वादळ नाशिक कसारा घाटामार्गे शहापूर तालुक्यातून मुंबईत दाखल झालं. या मोर्चासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यातून हजारो शेतकरी सहभागी होत असल्याची माहिती किसान सभेच्या वतीनं देण्यात आली आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर मुंबईतील आझाद मैदानात देखील पोलीस प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी मुंबई पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या अनेक तुकड्या देखील मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाल्या आहेत.

उद्या राजभवनावर धडक
अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चावर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून ड्रोन कॅमेरा यांचा देखील वापर करण्यात आला आहे. मुंबईत आझाद मैदानात मोर्चा दाखल झाल्यानंतर आज सकाळी 11 वाजता मुंबईतील आझाद मैदानात भाजप सोडून इतर सर्व पक्षातील नेते एकत्र येणार असल्याची शक्यता आहे. यावेळी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11 वाजता केंद्र सरकारच्या या धोरणाला विरोध केल्यानंतर हा मोर्चा राजभवनाच्या दिशेनं कूच करणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार कृषी कायद्याविरोधातील आंदोलनात सहभागी होणार

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मुंबईच्या आझाद मैदानावर शेतकरी आंदोलनास पाठिंबा देणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्यमंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीनं काही शेतकरी संघटनांनी घेतलेल्या निदर्शनास पाठिंबा दर्शविला जाईल. नवाब मलिक पुढे म्हणाले की, शेतकर्‍यांच्या वतीने नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ राजभवनाकडे मोर्चा काढण्यात येईल. यापूर्वीचं शरद पवार यांनी शेतीशी संबंधित या कायद्यांना विरोध दर्शविला होता. केंद्र सरकारने हे कायदे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली होती.

मुंबईत शनिवारी रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पोलिसांची नाकाबंदी

मुंबईत राज्याच्या विविध भागातून शेतकऱ्यांचा मोर्चा दाखल झाला. त्यातच प्रजासत्ताक दिनही दोन दिवसांवर आहे. यामुळे मुंबईत घातपाताची ही शक्यता असल्यानं मुंबई पोलीस अलर्टवर आहेत. परवा रात्रीपासूनच यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर मोठी नाकाबंदी करण्यात आली आहे. सशस्त्र पोलिसांसह, रिफ्लेकटर, एलईडी लाईट आणि अत्याधुनिक बेरिकेटिंगसह मुंबईच्या घाटकोपर अंधेरी लिंक रोड, एलबीएस मार्ग, घाटकोपर मानखुर्द लिंक रोड, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग आणि मुंबईच्या सर्वच वेशींवर मोठ्या प्रमाणत बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईत प्रवेश करणारे प्रत्येक वाहन तपासले जात आहे.

शेतकरी  मोर्चा अपडेट – (एबीपी  माझा)

शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी राज्यपालांकडून संध्याकाळी पाचची वेळ

शेतकरी मोर्चा आज राजभवनावर धडकणार, मात्र राज्यपाल भगत सिंह कोश्यारी सध्या गोव्यात असून ते  संध्याकाळी मुंबईत परतणार आहेत. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी राज्यपालांकडून संध्याकाळी पाचची वेळ देण्यात आलेली आहे. शेतकरी नेते राजभवनावर सचिवांकडे निवेदन देतिल॰

मुख्यमंत्र्यांनी मोर्चात सहभागी होऊ नये, राष्ट्रवादीची भूमिका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोर्चात सहभागी होऊ नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निकटवर्तीयांनी ही माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे घटनात्मक पदावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात मोर्चा काढणं संयुक्तिक ठरत नाही. त्यामुळे त्यांनी मोर्चात सहभागी होऊ नये, असा सल्ला राष्ट्रवादीने दिला आहे. परिणामी मुख्यमंत्री या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता मावळली आहे.

आझाद मैदानावर मोर्चा थांबवण्याचा प्रयत्न : विश्वास नांगरे पाटील

बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवला आहे. आझाद मैदानात फक्त आंदोलन करता येतं, दक्षिण मुंबईत मोर्चे काढता येत नाही. आम्ही नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. आझाद मैदानातून आंदोलक बाहेर पडताच मोर्चा थांबवण्याचा आमचा उद्देश आहे, अशी माहिती मुंबईचे सह पोलीस आयुक्त (कायदा-सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी दिली राजभवनावर जाण्यासाठी शेकऱ्यांचा मोर्चा निघाला तर, मोर्चा आझाद मैदानावरच अडवण्याचा प्रयत्न करणार, विश्वास नांगरे पाटील अशी माहिती  त्यांनी दिली आहे.

जागतिक स्तरावरील अभूतपूर्व आंदोलन उद्या राजधानीत होणार : संजय राऊत

शेतकरी आंदोलन गेल्या 60 दिवसांपासून देशाच्या राजधानीत सुरु आहे. उद्या ट्रॅक्टर रॅली आहे. जागतिक स्तरावरील अभूतपूर्व आंदोलन उद्या होत आहे. दिल्लीत जे शेतकरी एकत्र आले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातही ठिकठिकाणचे शेतकरी मुंबई पोहोचले आहेत.

मुख्यमंत्र्यांचा आंदोलनाला पाठिंबा: अजित नवले

कायदा मागे नाही तोपर्यंत आंदोलन मागे नाही, अशी भूमिका संयुक्त किसान मोर्चाने घेतली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध संघटना मोर्चात सहभागी झाले आहेत. शरद पवार, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे मोर्चात सहभागी होणार आहेत. तर मुख्यमंत्र्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. कायद्याला धरुन आम्ही सगळे शेतकरी अडीच वाजता राजभवनाकडे कूच करु, अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली.

शेतकऱ्यांचं आंदोलन प्रसिद्धीसाठी : रामदास आठवले

किसान सभेने मुंबईत आंदोलन करण्याची गरज नाही. हे आंदोलन प्रसिद्धीसाठी आहे. कायदा सरकारने केला आहे, मागे घेण्याचा प्रश्न नाही. शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवायला हवं : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी माझाशी बोलताना दिली. तसेच केंद्र सरकारने कृषी कायदे मंजूर करण्याची घाई केली, त्यामुळे शेतकऱ्यांवर मोर्चाची वेळ ओढावली आहे, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली.

पारंपरिक वाद्य वादन आणि आणि नृत्याने आंदोलक शेतकऱ्यांच्या दिवसाची सुरुवात

मुंबईत धडकलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाचा आजचा महत्त्वाचा दिवस आहे. काल पारंपरिक तारपा नृत्याने रात्री या सर्व शेतकऱ्यांनी एकता दाखवली होती. तर आज या शेतकऱ्यांची पहाट ही पारंपरिक वाद्यांच्या वादनाने आणि पारंपरिक नृत्याने होत आहे. ढोल, टाळ आणि पावरी च्या वादनाने आजच्या आंदोलनाला सुरुवात होत आहे.

शेकडो किलोमीटर अंतर कापून मुंबईत दाखल झालेले शेतकरी आझाद मैदानात निवांत झोपी गेले. मैदानात तयार करण्यात आलेल्या मंडपात हजारो शेतकऱ्यांनी रात्री आराम केला. या आंदोलनाला राज्यातील विविध पक्ष आणि संघटनांनी समर्थन दिले आहे. आज या आंदोलनात अनेक मोठे नेतेही सहभाग घेणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी भव्य व्यासपीठही तयार करण्यात आले आहे. त्याच्या समोरच या हजारो शेतकऱ्यांनी आपला तळ ठोकला आहे.

दिल्लीला सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी काल हजारोच्या संख्येने महाराष्ट्रमधील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून हे शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र रात्री देखील त्यांच्यात उत्साह दिसून आला. या ठिकाणी आदिवासी विभागातून आलेल्या शेतकऱ्यांनी रात्री एकत्रित पारंपरिक वाद्यांच्या धूनवर ठेका धरला. तारपा नृत्य करत या शेतकऱ्यांनी आपला थकवा घालवला. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला देखील या नृत्यात सहभागी झाल्या होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या