Ticker

6/Breaking/ticker-posts

गावकीच्या राजकारणात नेत्यांची पंचाईत .


 

 अनेक गावात पक्षांतील दोन गट  आमने सामने 

 नगर :-  गावात- गावात ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे . निवडणूक वातावरणात रंगत निर्माण झाली आहे . निवडणूकीच्या मैदानात महाविकास आघाडी अन् भाजप यांच्यामध्ये सामना होत असला तरी अनेक गावात महाआघाडीच्या दोन गट एकमेकांविरोधात मैदानात उतरले आहेत.  हीच स्थिती भाजपमध्ये निर्माण झाली आहे .पक्षातीलच दोन गट मैदानात उभे ठाकल्याने कोणत्या गटाचा प्रचार करावा ? अशा पेचात तालुक्यातील नेते सापडले आहेत. त्यामुळे गावकीच्या राजकारणात नेत्यांची ' पंचाईत ' होत असल्याचे चित्र दिसत आहे .

       सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूकीत तालुक्यातील नेते मंडळी प्रचारात उतरली आहेत . आगामी  निवडणूकीचे गणित जुळविण्यासाठी ग्रामपंचायतींवर आपल्या वर्चस्वाचा झेंडा फडकविण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजप सरसावले आहेत. मात्र अर्ज माघारीनंतर अनेक गावात महाविकासआघाडीतील घटक पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत . तर काही गावात भाजपमधील दोन गावकीच्या निवडणूकीत एकमेकांविरोधात मैदानात उतरले आहेत.  काही ठिकाणी महाआघाडीतील घटक पक्ष आणि भाजपाची युती झाली आहे. गावागावात निवडणूक प्रचार रंगात आला असून , ग्रामपंचायतीवरील वर्चस्वासाठी नाराज गटातील कार्यकर्ते फोडाफोडी , मतदारांना विकासाचे प्रलोभने दाखविण्यास सुरूवात झाली आहे . अनेक ठिकाणी निवडणूकीत भाऊबंदकी उभी ठाकली आहे .एकूणच सर्वत्र काट्याची लढती पाहवयास मिळत आहेत .

 प्रचार करायचा कोणाचा ? नेत्यांची होतेय पंचाईत 

तालुक्यातील अनेक गावात महाविकास आघाडी व भाजपमधील दोन गट स्वतंत्रपणे निवडणूकीच्या मैदानात एकमेकांविरोधात मैदानात उतरले आहेत . यामधील दोन्ही गटांचे नेते एकच आहेत. दोन्ही गटांना आपल्या नेत्यांच्या राजकीय पाठबळाची अपेक्षा आहे. दोन्ही गट मदतीसाठी नेत्यांच्या घरी पायधुळ झाडत आहेत . दोन्ही गट आपलेच असल्याने कोणाला पाठबळ दयावे अशा पेच नेत्यांपुढे निर्माण झाला आहे.  एका गटाला मदत केली तर दुसरा गट नाराज होत आहे. पुढील निवडणूकांचा विचार करता दोन्ही गटांची नाराजी टाळण्याची कसरत नेत्यांना करावी लागत आहे .एकूणच गावकीच्या राजकारणात नेत्यांची मोठीच पंचाईत होत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या