स्व. आ. राजीवजी राजळे यांची समाजसेवेची परंपरा अखंड सुरू ठेवणारः आ. मोनिका राजळे
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव : स्व. आमदार राजीवजी राजळे यांनी मानवसेवेचा ध्यास घेत आदी फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजोपयोगी व लोकहिताचे अनेक उपक्रम राबवले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी देशी वृक्षबियांचे संकलन व संवर्धन, वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठी भव्य पुस्तक प्रदर्शन, हास्य कवी संमेलन, संगीत मैफिली, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती यांसारखे अनेक विधायक उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबविले. त्यांची समाजसेवेची ही परंपरा अखंडीतपणे सुरू ठेवणार असल्याचे प्रतिपादन आ. मोनिका राजळे यांनी केले.
आदी फाउंडेशन, आदिनाथनगर यांच्या वतीने शेवगाव तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, एमपीएससी, यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करून विविध अधिकारी पदांवर निवड झालेल्या अधिकार्यांचा तसेच शेवगाव तालुक्यात शिक्षक पदावरून केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती झालेल्या नवनियुक्त केंद्रप्रमुखांचा गुणगौरव व सत्कार सोहळा शुभम मंगल कार्यालय, शेवगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी आमदार मोनिका राजीव राजळे बोलत होत्या., उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू, तहसीलदार आकाश दहाडदे, पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव तसेच शिक्षणाधिकारी शैलजा रावळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. राजळे पुढे म्हणाल्या की, स्व. राजीवजी राजळे यांनी सुरू केलेली समाजसेवेची परंपरा अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेण्याच्या उद्देशाने आदी फाउंडेशनतर्फे मागील वर्षापासून इयत्ता १० वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेले अधिकारी तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येत आहे. काल पाथर्डी तालुक्यातील गुणवंतांचा गौरव करण्यात आला असून आज शेवगाव तालुक्यातील विद्यार्थी, अधिकारी व नवनियुक्त केंद्रप्रमुखांचा सन्मान करण्यात आला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते, स्पर्धा परीक्षांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो आणि समाजात गुणवत्तेला योग्य प्रतिष्ठा प्राप्त होते, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा तालुकाध्यक्ष महेश फलके यांनी केले. उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू तसेच तहसीलदार आकाश दहाडदे यांनी विद्यार्थी, पालक व शिक्षकांना शिक्षण, स्पर्धा परीक्षा, करिअर नियोजन आणि प्रशासकीय सेवांमधील संधी याविषयी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश बाबर व राजीव सुरवसे यांनी केले, तर गणेश रांधवणे यांनी आभार मानले.
यावेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, नगरसेविका आशाताई बुलबुले, सविता फडके, डॉ. गीता लांडे, नगरसेवक गणेश कोरडे, सागर फडके, विनोद मोहिते, , भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्ष विद्याताई आधाट, मीनाताई कळकुंबे, शहराध्यक्ष दिपाली काथवटे, उमेश भालसिंग, यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, पालक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

0 टिप्पण्या