वन विभागाकडून तपास सुरू.
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
श्रीगोंदा -श्रीगोंदा तालुक्यातील कोसेगव्हाण येथील माळढोक अधिसूचित क्षेत्रात बिबट्याचे मुंडके व मागील दोन पाय आढळून आल्याने वन विभागात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
शनिवार (दि. ११ जुलै) रोजी कोसेगव्हाणचे सरपंच नलगे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली भगत यांना माळढोक अधिसूचित क्षेत्रात बिबट्याचा मृतदेह असल्याची माहिती दिली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. पाहणीदरम्यान बिबट्याचे मुंडके व मागील दोन पाय आढळून आले. परिसरात इतर अवयवांचा शोध घेण्यात आला, मात्र ते सापडले नाहीत.
वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्याचा मृत्यू अंदाजे आठ ते दहा दिवसांपूर्वी झाला असावा. सापडलेल्या अवयवांवर आळ्या पडलेल्या होत्या. हे अवशेष श्रीगोंदा येथे आणून पशुवैद्यकीय अधिकार्यांकडून त्यांची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान बिबट्याचे सर्व दात व नखे सुस्थितीत आढळून आल्याने शिकारीच्या उद्देशाने त्याची हत्या झाल्याची शक्यता सध्या दिसून येत नाही. एखाद्या वन्य प्राण्याने बिबट्याच्या मृतदेहाचा मधला भाग खाल्ला असावा, अशी प्राथमिक शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे.
ही घटना माळढोक अधिसूचित क्षेत्रात घडल्याने पुढील तपास माळढोक पक्षी अभयारण्याच्या अधिकार्यांकडून व कर्मचार्यांकडून सुरू असून, बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे.
.jpg)
0 टिप्पण्या