Ticker

6/Breaking/ticker-posts

वारकऱ्यांची चोख व्यवस्था ठेवा : पालकमंत्री विखे पाटील यांच्या सूचना



प्रशासन व वारकऱ्यांच्या समन्वयाने आषाढी वारी दिंड्यांचे उत्तम नियोजन - पालकमंत्री 

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहिल्यानगर, -जिल्ह्यातील दिंडी सोहळ्याचे प्रमुख, वारकरी व प्रशासनातील अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या एकमेकांमधील समन्वय व सहकार्याने पालखी सोहळ्याचे उत्तम नियोजन करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. 


वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी चोख व्यवस्था ठेवण्यात यावी, अशा सूचना त्यांनी जिल्हा प्रशासानातील अधिकाऱ्यांना केल्या‌.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आषाढी वारी नियोजन बैठकीत पालकमंत्री श्री.विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, ह.भ.प.अशोक सावंत आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, आपल्या जिल्ह्यातून २६० दिंड्या करमाळा मार्ग सोलापूर जिल्ह्यात मार्गस्थ होतात. संत निवृत्तीनाथ पालखी मार्ग निर्हेण ते शेगुड पर्यंत रस्त्यांचे खड्डे बुजविण्यात यावे. साईड पट्ट्या दुरूस्त कराव्यात‌. दिंडी मार्गावरील पारेगाव येथे मुलभूत सुविधा पुरवाव्यात. संपूर्ण पालखी मार्गावर रूग्णवाहिका तयार ठेवण्यात यावेत. दिंड्याच्या नोंदणीसाठी प्रत्येक तहसील कार्यालयात शिबिर आयोजित करण्यात यावे.

यावर्षी पालखीच्या सुरूवातीलाच पाऊस होत आहे, त्यामुळे वारकऱ्यांची सुरक्षा म्हणून यापुढे पावसाचे अंदाज वर्तविणारी अद्यावत यंत्रणा उभारण्यात येणार आहे‌. जिल्ह्यातून जाणाऱ्या २६० दिंड्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी - कर्मचाऱ्यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.‌ प्रत्येक दिंडीत पुरेसे औषधे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

श्री.विखे पाटील म्हणाले, ज्या गावात अथवा शहरामध्ये या दिंड्या मुक्कामी थांबणार आहेत त्या ठिकाणच्या शाळा, महाविद्यालय, मंगल कार्यालयामध्ये वारकऱ्यांची मुक्कामाची व्यवस्था करण्यात येणार असून त्याठिकाणी शुद्ध पिण्याचे, पाणी, अखंडितपणे वीज, आरोग्य व शौचालयाची व्यवस्थाही केली जाणार आहे. मागील वर्षीच्या दिंडीतील वारकऱ्यांच्या अडचणी यावर्षी दूर केल्या जातील. वारकऱ्यांच्या सूचनांची दखल घेतली जाईल.

वारकरी पायी चालत असलेल्या मार्गावर वाहतुकीचे नियमन करण्याबरोबरच वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी दिंड्यासोबत पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा. दिंड्या ज्याठिकाणी मुक्कामी राहतील तेथेही पोलीस कर्मचारी उपस्थित राहतील दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

पालखीमार्गावर आवश्यक साधनांसह तात्पुरते आरोग्य केंद्र उभारण्यात यावे, श्रीक्षेत्र नेवासा येथील ज्ञानेश्वर देवस्थानाचा ७०० कोटींचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे, मागील वर्षाप्रमाणे यावर्षी प्रत्येक दिंडीला २० हजार रूपये अनुदान व प्रत्येक वारकऱ्यास पाच लाख रूपयांचा विमा देण्यास शासन कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले.

अनेकवेळा मुक्कामाच्या ठिकाणी अशुद्ध पाणी पिल्याने अनेक वारकरी आजारी पडतात. त्यामुळे प्रत्येक दिंड्यातील वारकऱ्यांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. ज्या दिंड्याकडे स्वतःचे पाणी टँकर आहेत, त्यांच्या टँकरमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरून देण्याची व्यवस्था करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

दिंडीमध्ये अस्वच्छता होऊ नये यासाठी 'हरित वारी - निर्मल वारी' उपक्रम राबविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

आमदार शिवाजीराव‌ कर्डीले, आ.विठ्ठलराव लंघे, आ.अमोल  खताळ यांनीही वारीच्या नियोजनाच्या दृष्टीने सूचना केल्या.

याबैठकीला जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील ७६ दिंडीचे प्रमुख तसेच वारकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

---

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या