लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
शेवगाव : सामनगाव,(ता.शेवगाव)येथे लोकसहभागातून सुरू असलेले ढोरा नदी खोलीकरणाचे काम महसूल विभागाच्या पथकाने बंद पाडल्याने ग्रामस्थांचा प्रक्षोभ पहायला मिळाला.स्थानिक राजकीय द्वेषातून झालेल्या तक्रारींची शहानिशा न करता केलेल्या या कारवाईमुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. दुष्काळी परिस्थितीत लोकसहभागातून पाण्यासाठी चळवळ उभी करणाऱ्या गावांना पाणीदार होण्यात महसूल विभागाचाच अडसर असल्याचे सिद्ध झाले आहे.
सततच्या दुष्काळी परिस्थितीशी सामना करणाऱ्या सामनगाव येथील ग्रामस्थांनी त्यावर मात करण्यासाठी लोकसहभागातून ढोरा नदी व बंधारा खोलीकरणाचे काम हाती घेतले आहे.गेल्या ३ एप्रीलपासून लोकवर्गणीतून सुरू असलेले हे काम सद्यस्थितीत अंतिम टप्प्यात आहे.मात्र,स्थानिक राजकीय द्वेषातून झालेल्या तक्रारींची शहनिशा न करता महसूल विभागाच्या पथकाने गौण खनिजाचे कारण पुढे करत काम बंद करण्यास भाग पाडले.लोकसहभागातून सुरू असलेले काम अशा पध्दतीने बंद करण्यासाठी पथक आल्याचे समजताच महिला व ग्रामस्थांनी नदीपात्रात धाव घेतली.डंपर व पोकलेन मशीन सील करण्यास त्यांनी प्रचंड विरोध केला.ग्रामसभेने रितसर ठराव घेऊन संबंधित विभागाकडे याबाबत पत्रव्यवहार करून रितसर परवानग्या घेतलेल्या आहेत.या कामातून निघणारी वाळूमिश्रीत माती,गाळ पात्राच्या दोन्ही बाजूनी भिंतीवर व शेतकऱ्यांना मागणीनुसार दिलेला आहे.
मात्र,स्थानिक राजकीय द्वेषातून झालेल्या तक्रारीची दखल घेण्यापूर्वी त्या कामामागील उदात्त हीत व लोकभावना न पाहता कारवाई झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.या बाबतचे सर्व रेकॉर्ड व व्यवहार पारदर्शी असताना गावाला पाणीदार होण्यात महसूल विभागाचाच अडसर का?असा सवाल सरपंच आदीनाथ कापरे यांनी केला असून याबाबत तातडीने काम सुरू करण्याचा सकारात्मक निर्णय न घेतल्यास ग्रामस्थ रस्त्यावर उतरून जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढच्या पिढ्या आम्हाला माफ करणार नाही
आम्ही गेल्या अनेक वर्षापासून पाण्याअभावी दुष्काळाचा सामना करत आहोत.त्यावर मात करण्यासाठी आम्ही पदरपोड करून नदीचे खोलीकरण सुरू केले यात अशा पध्दतीने राजकीय डुख धरून आडकाठी आणली जात असेल तर आम्ही ते सहन करणार नाही. पुढच्या पिढ्या पाण्याअभावी आम्हाला माफ करणार नाही.
-लक्ष्मीबाईं काळे(ग्रामस्थ, सामनगाव)
परवानग्यांची छाननी करून सहकार्य करू
नदी खोलीकरणाच्या कामाच्या अनुषंगाने संबंधित सर्व विभागाच्या रितसर परवानग्याचे पत्र दाखवले नसल्याने महसूल विभागाने ही कारवाई केलेली आहे.याची शहनिशा करून गावातील लोकभावनेचा आदर करून पुढील कामास सहकार्य करू.
-प्रशांत सांगडे,(तहसीलदार,शेवगाव)
0 टिप्पण्या