लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर :: राज्यात सत्तेत येताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आपले मनसुभे पूर्ण करण्याचा सपाटा लावला आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळवत अजित पवार यांनी पहिली खेळी यशस्वी केली. त्याच धोरणानुसार नगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळविण्याचे राजकीय डावपेच आखण्यात येत असून नगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दिलीप वळसे पाटील यांना बसवायचेच, अशी खलबते सुरु आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे सर्वाधिक काळ पालकमंत्री राहिले आहेत. त्या माध्यमातून त्यांनी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण अशी संपूर्ण पुणे जिल्ह्यावर मजबूत राजकीय पकड निर्माण केली आहे.
एखाद्या जिल्ह्याच्या राजकारणावर पकड निर्माण करायची असेल तर त्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद ताब्यात पाहिजे, हा अलिखित राजकीय नियमच आहे. त्यात वळसे पाटलांनी नगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सांभाळले आहे. त्यावेळी त्यांनी जिल्ह्याचे राजकारण आणि प्रशासनावर मजबुत पकड निर्माण केली होती. विशेष म्हणजे त्यावेळी नगर जिल्ह्यातील विरोधी म्हणजेच तत्कालीन शिवसेना आणि भाजपच्या आमदारांची संख्या आजच्या पेक्षा अधिक होती.
आज जिल्ह्यात एकट्या राष्ट्रवादीचे ६ आमदार आहेत. त्यातील राहुरीचे प्राजक्त तनपुरे हे त्यांचे मामा जयंत पाटील यांच्यामुळे तर कर्जत्-जामखेडचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे काका अजित पवारांसोबत गेलेले नाहीत. उर्वरित अकोल्याचे किरण लहामटे, कोपरगावचे आशुतोष काळे, पारनेरचे निलेश लंके, नगर शहराचे संग्राम जगताप हे चौघेही अजित पवार गटात सामील आहेत. अपक्ष आमदार आणि शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) सहयोगी सदस्य शंकररावं गडाख यांना अजित पवारांनी गळ घातल्यास तेही अजितदादांच्या गटात दिसू शकतात.
या पार्श्वभूमीवर आपला गट नगर जिल्ह्यात मजबूत करण्यासाठी नगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळविण्याचे डावपेच अजित पवार गटाने आखले असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळाली आहे. तसे झाल्यास जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी दिलीप वळसे पाटील विराजमान झालेले दिसतील, असा राजकिय निरीक्षकांचा कयास आहे.
0 टिप्पण्या