Ticker

6/Breaking/ticker-posts

एक रूपयात पीक विमा लाभ देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

 कृषी योजना प्रचार रथाचे उद्घाटन




लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)  


शिर्डी,  (प्रतिनिधी) - एक रुपयात पीक विमा योजना ही राज्‍य शासनाने  सुरु केलेली महत्त्वाकांक्षी योजना शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे‌. शेतकऱ्यांना अशा योजनेतून लाभ देणारे महाराष्‍ट्र राज्‍य हे देशात एकमेव राज्य आहे. असे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍घ व्‍यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आज येथे केले.  


       राज्‍य शासनाने खरीप व रब्‍बी हंगामाकरीता सुरु केलेल्‍या एक रुपयात पीक विमा योजनेचा प्रसार करण्‍यासाठी तयार करण्‍यात आलेल्‍या  रथाचे उद्घाटन महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांच्‍या हस्ते करण्‍यात आले. या रथांना हिरवा झेंडा दाखवून संपूर्ण जिल्‍ह्यामध्‍ये शेतकऱ्यांना या योजनेची माहिती देण्‍यासाठी हे रथ जिल्‍ह्यामध्‍ये रवाना करण्‍यात आले.


       याप्रसंगी जिल्‍हा अधीक्षक कृषी आधिकारी सुधाकर बोराळे, उपविभागीय कृषी आधिकारी विलास गायकवाड, मच्छिंद्र थेटे, दिपक पठारे, सतिष कानवडे, अशोकराव धावणे यांच्‍यासह कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व महिला मोठ्या संख्‍येने उपस्थित होत्‍या.


       याप्रसंगी बोलताना महसूलमंत्री श्री.विखे पाटील म्‍हणाले की, यापूर्वी पीक विमा योजनेचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागला.  शेतकऱ्यांची आर्थिक लुट आणि फसवणूक झाली. या परिस्थितीमध्‍ये बदल करण्‍यासाठी राज्‍य सरकारने शेतकऱ्यांना करिता एक रुपयात पीक विमा योजना सुरु केली. त्‍याची अंमलबजावणी आता यंदाच्‍या खरीप हंगामापासून सुरु होत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. या योजनेचा कोणताही आर्थिक भार शेतक-यांवर पडणार नाही. शासनच आता विम्‍याची रक्‍कम भरणार असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.


       या योजनेत सहभाग घेण्‍यासाठी शेतकऱ्यांनी स्‍वत:हून आता पुढे आले पाहिजे. हवामानातील बदल हे कृषी क्षेत्रापुढे मोठे आव्‍हान असल्‍याने आपल्‍या पीक उत्‍पादनाची सुरक्षितता वाढविण्‍यासाठी विमा योजनेचे संरक्षण कवच महत्‍वपूर्ण ठरणार आहे. शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयांमध्‍ये संपर्क साधून या योजनेची माहिती घ्‍यावी. असे आवाहन त्‍यांनी केले. जिल्‍ह्यातील कृषी अधिकाऱ्यांनी गावपातळीवर जावून या योजनेचा प्रसार आणि प्रचार करुन, योजनेची माहिती शेतकऱ्यांना देण्‍याच्‍या सूचनाही त्‍यांनी केल्‍या.


       जिल्‍हा अधीक्षक कृषी  अधिकारी सुधाकर बोराळे यांनी या पीक विमा योजनेत सहभाग घेण्‍यासाठी ३१ जूलै २०२३ ही अंतीम तारीख असून, शेतकऱ्यांनी आपले अर्ज दाखल करण्‍यासाठी आपले सरकार सेवा केंद्रामध्‍ये सुविधा उपलब्‍ध करण्‍यात आली असून, उपविभागीय कृषी आधिकारी, तालुका कृषी आधिकारी कार्यालयातही संपर्क साधून योजनेत सहभाग घेण्‍याचे आवाहन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या