Ticker

6/Breaking/ticker-posts

निती, नियत व इरादा पक्का असल्यास काहीही अशक्य - केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

  लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

    शेवगाव :  दि. २ ऑक्टो २२    

केंद्र सरकारच्या शेतकरी तसेच सर्वसामान्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना आहेत. मात्र ,त्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहचणे गरजेचे आहे. निती, नियत आणि इरादा पक्का असल्यास काहीही अशक्य नाही, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या शिकवणीवरच पक्षाची वाटचाल सुरु आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.

        

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमीत्त शेवगाव येथे भाजपा आयोजित सेवा पंधरवाडा अभियान समारोह कार्यक्रम प्रसंगी ना.डॉ.कराड बोलत होते.खा.डॉ.सुजय विखे,आ.मोनिका राजळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, बापू वाघमोडे, जिल्हा सरचिटणीस दिपक बडे, गोपीनाथ वाघ, तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष आशा गरड, शहराध्यक्ष उषा कंगणकर, मुख्याधिकारी संतोष लांडगे, बापुसाहेब पाटेकर, बापुसाहेब भोसले, अभय आव्हाड, दिनेश लव्हाट, भिमराज सागडे, कचरु चोथे, तुषार वैद्य,सागर फडके, महेश फलके, माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण, भालसिंग, गणेश कराड, केशव आंधळे, अमोल गर्जे आदी याप्रसंगी उपस्थित होते
डॉ. कराड पुढे बोलताना म्हणाले,केंद्र सरकारच्या गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य मिळते तसेच यापूर्वी ठराविक लोकांसाठी असलेल्या राष्ट्रीयकृत बँका आता सर्वसामान्य नागरीकांसाठी कार्यरत असून ४६ कोटी ७० लाख जनधन खातेदार त्याचा लाभ घेत आहेत.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून ११ कोटी शेतक-यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची थेट मदत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होत आहे.आधार कार्ड बँक खात्याला लिंक असल्याने भ्रष्टाचाराला वाव नाही, असे सांगून ते म्हणाले, शेवगाव विधानसभा मतदार संघात राष्ट्रीयकृत बँकांचे जाळे निर्माण करुन नाबार्ड अंतर्गत येणा-या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी दिली जाईल.

        

 यावेळी खा.डॉ.विखे यांनी राष्ट्रीयकृत बँकेकडून शेतक-यांच्या मुलांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक कर्जासंदर्भात मंत्रिमहोदयाचे लक्ष वेधून योग्य निर्णय घेण्याची मागणी केली. तर,आ.राजळे यांनी डॉ.कराड पाथर्डी तालुक्याचे जावई असल्याने शेवगाव मतदार संघाच्या विकासासाठी त्यांनी झुकते माप द्यावे,अशी अपेक्षा व्यक्त केली.

        

 यावेळी नगर परिषद कार्यालय परिसरात डॉ. कराड यांच्या हस्ते वृक्षारोपन करून स्वच्छता अभियान राबवण्यात आले तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन त्यांनी केले. प्रास्तविक जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी तर,सुत्रसंचालन राजू सुरवसे यांनी केले.वाय.डी. कोल्हे यांनी आभार मानले.   मंत्री महोदयांनी पंकजा मुंडेंचा नामोल्लेख टाळल्याने कार्यकर्ते नाराज

       भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा दसऱ्याला भगवान भक्तीगड सावरगाव येथे मेळावा होत असून पंकजांनी मावशी मानलेल्या शेवगाव - पाथर्डी मतदार संघात मंत्री डॉ. भागवत कराड यांचा हा पहिलाच दौरा होता. खा. विखे, आ. राजळे यांनी आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांचा आवर्जुन उल्लेख केला. मात्र, मंत्री डॉ. कराड यांनी त्यांचा नामुल्लेख टाळल्याने मुंडे समर्थक नाराज झाल्याचे प्रकर्षाने जाणवले. तसेच कार्यक्रम स्थळी निम्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या होत्या. याबाबत खुमासदार चर्चा सर्वत्र सुरू होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या