Ticker

6/Breaking/ticker-posts

पारनेरमध्ये विशेष सहाय्य योजनेतील बनावट १४८४ लाभार्थी अपात्र; शासनाचे महिन्याला १४ लाख ८४ हजारांची बचत

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)  

अहमदनगर, दि.१६ सप्टेंबर – पारनेर तालुक्यात सामाजिक अंकेक्षण मोहीमेंतर्गंत विशेष सहाय्य योजनेत १४८४ लाभार्थी अपात्र आढळून आले आहेत. या लाभार्थ्यांचे जुलै २०२२ पासून मानधन बंद करण्यात आले आहे. यामुळे शासनाचे दर महिन्याला १४ लाख ८४ हजार रूपयांची बचत झाली आहे. अशी माहिती पारनेरचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी  दिली. 


विशेष सहाय्य योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची पात्रता तपासणी वर्षातून एकदा करण्यात येते. विशेष सहाय्य योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन, संजय गांधी निराधार अनुदान व इंदिरा गांधी वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेसाठी पारनेर तालुक्यात  लाभार्थी अपात्र मोहीम राबविण्यात आली.  या योजनांच्या लाभार्थींच्या गावनिहाय यादया तलाठ्यांकडे तपासणीसाठी उपलब्ध करून देणेत आल्या. 


सामाजिक अंकेक्षण मोहीमेंतर्गंत १ मे २०२२ व १५ ऑगस्ट २०२२ रोजीचे ग्रामसभेत तलाठी यांचेमार्फत या याद्यांचे वाचन करण्यात आले. स्थानिक लोकप्रतिनिधी मार्फत देखील लाभार्थी पडताळणी साठी आवाहन करण्यात आले होते. गटविकास अधिकाऱ्यांमार्फत मागील दहा वर्षात मयत पावलेल्या व्यक्तींच्या गावनिहाय यादया उपलब्ध करून घेण्यात आल्या. यानुसार पारनेर तालुक्यातील एकूण ७८ गावातील १४८४ मयत तसेच अपात्र लाभार्थ्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. 


श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेत १०५७ (यापैकी मयत - ८१६, लाभार्थीचे मुले शासकीय सेवेत -२४, ६५ वर्षापेक्षा कमी वय अपात्र लाभार्थी - २१७), संजय गांधी निराधार अनुदान योजनेत १६४ (यापैकी मयत - ७, लाभार्थीच्या मुलाचे वय २५ वर्षापेक्षा जास्त अपात्र लाभार्थी - १५७) आणि इंदिरा गांधी वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेत सर्वच्या सर्व २६३ मयत लाभार्थ्यांना जुलै २०२२ पासून अनुदानासाठी अपात्र करण्यात आले आहे. विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची मुले शासकीय सेवेत, खासगी नोकरीत असल्यास किंवा इतर कोणताही शासकीय लाभ घेत असल्यास अशा लाभार्थ्यांनी स्वत:हून दर महिन्याचे मानधन घेणे बंद करावे. असे आवाहन ही तहसीलदार शिवकुमार आवळकंठे केले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या