सासऱ्यांसह पाळीव कुत्राही मदतीला धावला ; बिबट्याने ठोकली धुम
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पारनेर : बिबट्याने झडप घालून जबडयात पकडलेले आपल्या पतीचे डोके बघून जीवाची पर्वा
न करता पत्नीने बिबट्यावरच हल्ला चढवत त्याच्या पोटात जोराचा बुक्क्यांचा मार देत त्याचे
शेपूट व पाय ओढत त्याला बाजूला खेचण्याचा प्रयत्न केला. सुनेचा रुद्रावतार पाहून
सासऱ्यांनी दगडाने बिबट्यावर हल्ला केला तर पाळीव कुत्र्यानेही हल्ला चढविल्याने
बिबटयाने घाबरुन धुम ठोकली. या रणरागिणीची बिबट्याशी झुंज सर्वत्र चर्चेचा विषय ठरर्ली
आहे.
डोंगराच्या कुशीत असणाऱ्या दरोडी गावातील चापळदरा
भागात गोरख पावडे यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. (ता.२५) मध्यरात्री दोन च्या
सुमारास जनावरांच्या गोठ्यात आवाज येत असल्याने गोरख हे पाहण्यासाठी गेले असता
गोठ्यात लपलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करत डोकेच जबड्यात पकडले. गोरख
यांनी मोठमोठ्याने आरडाओरड केल्यानंतर पत्नी संजना यांनी गोठ्याकडे धाव घेतली
त्यांच्यासोबत गोरख यांचे वडील दशरथ व घरातील पाळीव कुत्रा देखील आला.
बिबट्याच्या जबड्यात पती
गोरख यांचे डोके पाहून अक्षरशः जीवाची पर्वा न करता या रणरागिणीने रुद्रावतार धारण
करत बिबट्याच्या पोटात बुक्क्यांचा मारा करत त्याचे पाय व शेपटी जोरात ओढली. वडील
दशरथ पावडे यांनी मोठा दगड उचलून बिबट्याला मारला व पाळीव कुत्र्याने आपला
मालकासाठी बिबट्याच्या गळ्यापाशी जोराचा चावा घेतला यामुळे चोहोबाजुने आपल्यावरील
आक्रमणाने बिबट्याला जीव वाचविण्यासाठी धूम ठोकावी लागली. रविवारी दिवसभर या थरारक
घटनेची दरोडी व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चर्चा होती.
पुढील उपचारासाठी गोरख
पावडे यांना नगर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेने परिसरात
बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद
करण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.
- संजना पावडे, बिबट्याशी झुंज देणारी महिला.
0 टिप्पण्या