Ticker

6/Breaking/ticker-posts

आमदार रोहित पवारांनी घेतल्या दिल्लीत अनेकांच्या गाठी- भेटी..

 









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

कर्जत-जामखेड:  कर्जत-जामखेड मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा दिल्ली गाठली आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आणि अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड या मंत्र्यांची भेट घेऊन मतदारसंघातील प्रश्नांबाबत त्यांच्याकडे पाठपुरावा केला.

आमदार पवार यानी यापूर्वीही दिल्लीत जाऊन अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या होत्या. कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी राज्य सरकारची तीन उपजिल्हा रुग्णालये आहेत. कर्जत तालुक्यातील मिरजगांवमध्ये महामार्गालगत तिसऱ्या उपजिल्हा रुग्णालयाला मान्यता दिली आहे. येथूनच राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने अपघात होण्याचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे अपघात झाल्यास अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार करणे आवश्यक आहे. याच संदर्भात आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांची भेट घेऊन 'नॅशनल हेल्थ मिशन' अंतर्गत मिरजगाव येथील उपजिल्हा रुग्णालयाला 38.35 कोटी रुपये निधीची तरतूद करण्याची मागणी केली.

 दरम्यान, मतदारसंघात केंद्र सरकारच्या SFURTI योजनेअंतर्गत मध्यवर्ती सुविधा केंद्र सुरु करावे, या मागणीसाठी रोहित पवार यांनी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खात्याचे मंत्री नारायण राणे यांचीही भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. मध्यवर्ती सुविधा केंद्र सुरु झाल्यास हस्त कारागिरांच्या उत्पादनाला चालना मिळेलच शिवाय त्यांना हक्काची बाजारपेठही उपलब्ध करुन देण्याचा रोहित पवार यांचा प्रयत्न आहे.

मतदारसंघातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा सुरू करून सर्वसमावेशक बँकिंग सेवा वाढविण्यासंदर्भात त्यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची यापूर्वी भेट घेतली होती. त्यानंतर या प्रक्रीयेला मोठ्या प्रमाणात गती मिळाली. आता राज्य पातळीवरील बँकींग कमिटीअंतर्गत (एसएलबीसी) बँकांच्या शाखांना तातडीने मान्यता द्यावी, अशी मागणी रोहित पवार यांनी पुन्हा एकदा डॉ. कराड यांना भेटून केली. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन डॉ. कराड यांनी दिले आहे. विशेष म्हणजे पवार यांनी केलेल्या या पाठपुराव्याचा फायदा केवळ कर्जत-जामखेडलाच नव्हे तर संपूर्ण राज्याला होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या