Ticker

6/Breaking/ticker-posts

कर्जत जामखेडचे रस्ते होणार आता चकाचक.. आमदार रोहित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी भेट






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 कर्जत/जामखेड- कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांसोबतच राज्य व इतर रस्त्यांसाठी भरीव निधी आणण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत गडकरी यांनी निधी देण्याची तयारी दर्शवली अशी माहिती आमदार रोहित पवार यानी दिली.

कर्जत जामखेड मधून चाकण-शिक्रापूर-न्हावरे-श्रीगोंदा-जामखेड-बीड ५४८ D हा प्रमुख महामार्ग आहे. या महामार्गापैकी श्रीगोंदा ते जामखेड या टप्प्याला नितीन गडकरी यांनी निधी दिला असून नगरमध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि गडकरी यांच्या उपस्थितीत या महामार्गाच्या कामाचे भूमीपूजनही झाले आहे. यावेळी या महामार्गावरील जामखेड ते सौताडा या पुढील टप्प्यासाठी गडकरी यांनी मंजुरी दिली. त्यासाठी आता निधीची तरतूद करण्याची विनंती आमदार रोहित पवार यांनी गडकरींना केली. तसेच केंद्रीय रस्ते निधी (सीआरएफ) अंतर्गत प्रत्येक राज्यातील इतर रस्त्यांनाही निधी दिला जातो. त्यानुसार कर्जत-जामखेड मतदारसंघातील राज्य व इतर रस्त्यांच्या कामांसाठीही निधी देण्याची विनंती त्यांनी यावेळी केली.

पैठण ते पंढरपूर हा ७५२ ई पालखी महामार्ग कर्जत-जामखेड मतदारसंघातून जातो. या मार्गावरुन शांतीब्रम्ह श्री. एकनाथ महाराज, संत श्री. भगवानबाबा, संत गोरा कुंभार यांच्यासह इतरही पालख्या लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत दरवर्षी पंढरपूरला जात असतात. खर्ड्यापर्यंत या महामार्गाचे काम झाले आहे. आता कर्जत-जामखेड मतदारसंघातील खर्डा ते कुर्डुवाडी हा पुढील टप्पा राष्ट्रीय मार्ग म्हणून घोषित करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी यापूर्वीच गडकरी यांच्याकडे केली आहे. 

याबाबतही या भेटीत चर्चा झाली. हा टप्पा घोषित होऊन त्याचे काम पूर्ण झाल्यास पंढरपूरला जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांसह नगर, पुणे, उस्मानाबाद, औरंगाबाद, सोलापूर या जिल्ह्यातील नागरिकांनाही दळणवळणासाठी या रस्त्याचा मोठा फायदा होणार आहे. नगर-करमाळा-टेंभुर्णी हा ५१६ A हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला झाल्याने दळणवळणाला मोठा अडथळा होतो. त्यामुळे या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची विनंतीही आमदार रोहित पवार यांनी गडकरी यांना केली. त्यावर सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या