Ticker

6/Breaking/ticker-posts

कटी मान उडी पतंग... जिवघेणा 'पोर'खेळ

* नायलॉन मांजाचा धुमाकूळ

 * मानव व पक्षांवर संक्रात

* सरकारी अनास्थेचे बळी










लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर : सण कोणताही असो त्यातून आनंद मिळाला पाहिजे ही माफक अपेक्षा...ती दूरच राहिली पण मकर संक्रात ही मानवी  व पक्ष्यांच्या जीवावर संक्रात बनून राहिली आहे.

सोमवारी चितळे रस्त्यावर एका नागरिकाचा पाय नायलॉन मांजामुळे कापला गेला. अशा अनेक घटना या आधीही नगरमध्ये घडल्या आहेत. दरवर्षी संक्रांतीच्या आधी पाच-सहा दिवसांपासून पतंग उडवण्यास सुरवात होते. संक्रांतीच्या दिवशी पतंगोत्सवाचा कळस होतो. कोणताही उत्सव आनंद व उत्साहाचं प्रतीक असतो. वास्तविक पाहता, पतंग ही सुद्धा चीनने दिलेली देणगी आहे. तेथे मोकळ्या मैदानात विविध आकारांचे व प्रकारांचे पतंग उडवले जातात. फक्त आपल्याकडे पतंग उडवण्यापेक्षा दुसऱ्याचा पतंग कापण्यावरच अधिक भर असतो. त्यासाठी चिवट अशा नायलॉनच्या मांजाचा वापर केला जात आहे. तो माणसाबरोबर पक्ष्यांसाठीही खूप धोकादायक ठरत आहे.

अशा धोकादायक नायलॉन मांजाची नगरमध्ये विक्री सुरू आहे. संबंधित सरकारी यंत्रणा अजून झोपेत आहे. गेल्या वर्षी महापालिकेने काही विक्रेत्यांवर कारवाया केल्या. यंदा अजून या सर्व यंत्रणांना जाग आलेली नाही. त्यामुळे या धोकादायक मांजाची सर्रास विक्री सुरू आहे. पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करू नये. त्याऐवजी साध्या सुती दोऱ्याचा वापर करण्याचे आवाहन ‘आय लव्ह नगर’तर्फे करण्यात येत आहे. असेच आवाहन निसर्गप्रेमींसह अनेक डॉक्टर व संघटनाही करत आहेत दुसऱ्यांचे पतंग कापण्यासाठी आपला मांजा जास्तीत जास्त चिवट व धारदार असावा, अशा चुकीच्या भावनेतून नायलॉनच्या मांजाचा वापर होत आहे. त्यामुळे अनेक व्यक्ती विशेषतः वाहनचालक गंभीर जखमी होण्याच्या घटना घडत आहेत.

पारंपरिक मांज्यापेक्षा नायलॉन मांजा स्वस्त असला तरीही त्यापेक्षा कितीतरी पट धारदार असल्यानं हा अतिशय घातक आहे. पूर्वी पतंगप्रेमी मांजा स्वत: तयार करायचे. त्यासाठी वापरण्यात येणारा धागा सुती असायचा. आता नायलॉन वापरलेला मांजा बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. पूर्वी हा मांजा चीन मधून यायचा म्हणून त्याला चिनी मांजा असं नाव होतं. आता तो उत्तरप्रदेशातून आपल्याकडे येतो. नायलॉनच्या धाग्यापासून बनणार मांजा स्वस्त आणि धारदार असल्यानं याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नगरमध्ये एकूण वापरल्या जाणाऱ्या मांज्यापैकी ९० टक्के मांजा हा नायलॉनचाच असतो.  हा चिवट असल्याने पंतंगांची कापाकापी करण्यासाठी त्याला मोठी मागणी असल्याचं विक्रेते सांगतात.

आता बंदी आल्यानंतर या मांजाची किंमतही दुप्पट झाली आहे. सध्या जागोजागी पंतंग विक्रीची दुकाने सजली आहेत. नायलॉन मांजावरील बंदीमुळे विक्रेत्यांनी बाहेर फक्त पतंग व रिकामच्या चकऱ्याच विक्रीला ठेवल्या आहेत. मांजा मात्र आत किंवा दुसरीकडे ठेवलेला असतो. तो ग्राहकाने मागणी केली तरच दुकानात मागवला जातो. गेल्या महिन्यापासूनच विक्रेत्यांनी धोकादायक मांजाची साठवणूक केली आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत नायलॉन मांजावर बंदी आहे. पण, संबंधित सरकारी यंत्रणा याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. परिणामी नायलॉनच्या मांज्यामुळे पतंग उडवण्याचा हा उत्सवच गेल्या अनेक वर्षांपासूनन जीवघेणा ठरत आहे.

गेल्या पाच वर्षांत मांजाने गळा कापून ३० हून अधिक नागरिक कमी-अधिक प्रमाणात जखमी झाले आहेत. पुण्यात तर एका डॉक्टर तरुणीचा माजाने गळा कापला जाऊन मृत्यू झाला होता. शिवाय पतंग व मांजा पकडण्यासाठी झालेल्या धावपळीत अनेक मुलांचे प्राणही गेले आहेत. मांजामुळे वाहनचालकांचे अपघात होऊनही अनेकांचा मृत्यू झाला आहे. तरी हा धोकादायक प्रकार कमी होण्याऐवजी वाढतच आहे. या बाबत पालकांनीच जागरूक होऊन आपल्या मुलांच्या हाती नायलॉनचा मांजा जाणार नाही, याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

नगरमध्ये संक्रांतीचा दिवस खऱ्या अर्थाने पतंगांचा असतो. त्या दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात पतंग उडवले जातात, की त्यांच्यासाठी वापरलेला मांजा झाडांवर व इमारतींवर लटकून राहत असल्याने त्यात अडकून नगर परिसरात दरवर्षी शेकडो पक्षी जखमी होतात. त्यात पारवे (जंगली कबुतरे), पाळीव कबुतरे, कावळे, घारी, शिक्रा, केस्ट्रल अशा शिकारी पक्ष्यांसह पोपट, कोकीळ, चिमण्या, साळुंक्या आदी पक्ष्यांचा समावेश असतो. आतापर्यंत या मांजामुळे असंख्य पक्षी जखमी व पंख कापल्यानं कायमचे जायबंदी झाले आहेत. पतंगाचा मोसम संपल्यानंतर नगरमधील पक्षीप्रेमींना मांजात पक्षी अडकल्याचे फोन येत असतात. त्यातून काही पक्ष्यांची सहीसलामत सुटका होते. पण, बहुसंख्य पक्ष्यांचे पंख कापल्याने ते कायमचे अधू होतात. काहींचा उत्सवी आनंदामुळे अनेकांच्या जीवाशी खेळ होतो.

एवढा अनर्थ हा नायलॉनचा मांजा करत असतो, तरीही आर्थिक हितसंबंध व दुर्लक्ष यांमुळे या धोकादायक मांजाची विक्री होत आहे. या बाबत संबंधित यंत्रणा केव्हाही जाग्या होवोत, पण आता नागरिकांनी जागरूक होऊन या मांजाच्या विक्रीविरोधात यल्गार करण्याची गरज आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या