Ticker

6/Breaking/ticker-posts

आ.पाचपुतेंचा इशारा अन ना. मुश्रीफांची सारवा-सारव..

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

श्रीगोंदा: श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लँट व विस्तारित कोविड इमारतच्या उदघाटनपत्रिकेत आ. बबनराव पाचपुते यांचे नाव खाली टाकल्याने आ. पाचपुते चांगलेच संतप्त झाले .आ. पाचपुते यांनी  अधिकाऱ्यांकडे याबाबत जाब विचारला असता त्यांची बोलती बंद झाली. दरम्यान मनमानी पद्धतीने कारभार करणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात विधानसभेत हक्कभंग दाखल करण्याचा इशारा आ. पाचपुते यांनी दिला.

श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात आ. बबनराव पाचपुते यांच्या स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लँट व विस्तारीत कोविड इमारतीचे उदघाटन आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, मा. आ. राहुल जगताप, राजेंद्र फाळके, शुभांगी पोटे, घनश्याम शेलार उपस्थित होते. यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाची जी निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आली होती त्या निमंत्रण पत्रिकेत आ. पाचपुते यांचे खाली नाव टाकण्यात आले होते. ही बाब आ. पाचपुते यांना चांगलीच खटकली. कार्यक्रमादरम्यान आ. पाचपुते उपस्थित अधिकाऱ्यांना तुम्हाला प्रोटोकॉल कळतो का? असा सवाल केला.चाळीस वर्षे आमदार आहे, सात वेळा आमदार आहे. आम्ही काही बोलत नाही याचा तुम्ही वेगळा अर्थ काढू नका. त्यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सारवासारव करत वेळ मारुन नेली.

अधिकारी मनमानी पद्धतीने कारभार करत असून कार्यक्रम पत्रिका तयार करताना शिष्टाचार  कसा पाळायचा हे समजायला पाहिजे. शिष्टाचार न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात विधानसभेत हक्कभंग दाखल करणार असल्याचे आ. बबनराव पाचपुते यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकारचीच चर्चा तालुकाभर होत आहे.

 ना. हसन मुश्रीफांची सारवासारव

कोरोना अजून संपलेला नाही. प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे.तिसऱ्या लाटेची तयारी म्हणून या ठिकाणी ऑक्सिजन प्लँट उभा करण्यात आला आहे त्याच बरोबर विस्तारित कोविड इमारत उभारणीमुळे कोरोना रुग्णावर याठिकाणी उपचार करणे अधिक सुलभ होणार आहे. उपजिल्हा रुग्णालयाबाबत विचारणा केली असता ना. मुश्रीफ म्हणाले, या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयासाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्न होता तो आता मार्गी लागला आहे. लवकरात लवकर उपजिल्हा रुग्णालयाचे काम कसे सुरू होईल यासाठी मी स्वतः लक्ष घालणार आहे. कार्यक्रमाआधी प्रोटोकॉलवरून आ. पाचपुते अधिकार्यावर भडकल्याने वातावरण टाईट झाले होते, त्यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सारवासारव करत वेळ मारुन नेली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या