Ticker

6/Breaking/ticker-posts

नगर शहरातून जाणार्याा राष्ट्रीय महामार्गांची प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत- महापौर

 *शिवसेनेच्यावतीने ना.नितीन गडकरी यांना महापौर रोहिणी शेंडगे व संभाजी कदम यांचे निवेदन






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

 

नगर : नगर शहरातून जाणारे जवळपास सर्वच महामार्ग हे राष्ट्रीय महामार्ग म्हणून 2018 मध्येच घोषित झालेले आहेत. केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून यातील काही रस्त्यांची कामेही प्रस्तावित आहेत. शहरातील उड्डाणपुलाचे कामही प्रगतीपथावर आहे. मात्र, बहुतांशी कामे अद्याप सुरू झालेली नाहीत व सदरचे रस्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याची दुरुस्तीही होत नाही. त्यामुळे या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ही सर्व अपुर्ण कामे लवकरात लवकर पुर्ण करण्यात यावी, अशी मागणी महापौर रोहिणी शेंडगे व माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना.नितीन गडकरी यांच्याकडे केली. याप्रसंगी माजी नगरसेवक संजय शेंडगे, नगरसेवक सचिन शिंदे, दत्ता कावरे, अ‍ॅड.सतीश गिते आदि उपस्थित होते.

 

 

ना.गडकरी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावरील नेप्ती उड्डाणपूल ते शहरातील अमरधाम ते सक्कर चौक रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आहे. या रस्त्यासाठी सुमारे 30 कोटींचा निधीही मंजूर झालेला आहे. मात्र, अद्यापही या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. सदरचा रस्ता हा नगर शहरातील अत्यंत रहदारीचा रस्ता आहे. हजारो वाहने व अवजड वाहनांचीही या रस्त्यावरुन वाहतूक होते. या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मोजता येणार नाहीत, एवढे खड्डे या रस्त्यावर आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम तत्काळ करण्याचे आदेश द्यावेत, ही विनंती. याच महामार्गावर सीना नदीवरील पुलाची दुरवस्था झाली आहे. सद्यस्थितीत हा पूल अत्यंत धोकादायक झालेला आहे. रस्ता मंजूर करताना यात पुलाच्या कामाचा समावेश नसल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. त्यामुळे या कामात सीना नदीवरील पुलाच्या कामाचा समावेश करावा.

 

नगर-मनमाड महामार्गाचे काम केंद्र सरकारकडून मंजूर झालेले आहे. हा महामार्ग नगर शहरातील सावेडी उपनगर परिसरातून जातो. मध्य शहर व सावेडी उपनगराला जोडणारा हा प्रमुख महामार्ग आहे. या महामार्गाचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत चारपदरी रस्ता मंजूर आहे. मात्र, शहरातील वाढत्या रहदारीचा विचार करता, या रस्त्याचे नागापूर-एमआयडीसी ते पत्रकार चौकापर्यंत ते पोलिस अधीक्षक चौकापर्यंत रुंदीकरण करुन नव्याने रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर करावा.

 

नगर शहरात सध्या उड्डाणपुलाचे काम केंद्र सरकारकडून सुरू आहे. हे काम अतिशय वेगाने सुरू आहे. सदरचा महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित आहे. उड्डाणुलाचे काम सुरू असलेला महामार्ग सध्या अतिशय खराब झालेला आहे. काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामासाठीही निधी मंजूर व्हावा, अशी विनंती करण्यात आली.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या