Ticker

6/Breaking/ticker-posts

म. फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा 5 लाखांपर्यंत करावी- संभाजी कदम

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नगर: मध्यमवर्गीय नागरिकांसाठी सर्वात मोठा आधार असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा दीड लाखांची असून, ती वाढवून 5 लाखांची करावी, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी पाठविले.

 मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारमार्फत सामान्य नागरिकांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत आरोग्य सेवा दिली जाते. या सेवेचा सामान्य नागरिकांना मोठा लाभ मिळत आहे. कोरोनाचा या योजनेत समावेश केल्याने कोरोना बाधित रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. सद्यस्थितीत या योजनेमधून प्रत्येक कुटूंबाला उपचारासाठी 1 लाख 50 हजार रुपयांची मर्यादा आहे. सदरची योजना ही शासकीय व खासगी रुग्णालयातही राबविली जाते. अनेक नागरिकांनी खासगी रुग्णालयातून या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यामुळे वर्षभरातील दीड लाख रुपयांची मर्यादा संपलेली आहे.

 कोरोना उपचारानंतर अनेकांना म्युकर मायक्रोसिस या फंगल इन्फेक्शनचाही त्रास झाला आहे, त्याचेही उपचार या योजनेतून मोफत होत आहेत. या उपचारांचा खर्च पाहता दीड लाख रुपये खर्चाची मर्यादा ही तुटपुंजी आहे. आधीच कोरोना प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रात आर्थिक नुकसान झाले आहे. सामान्य नागरिक आर्थिक संकटांना तोंड देतांना हतबल झाले आहेत. अशातच एखाद्या इतर आजारासाठी वैद्यकीय उपचार करण्याची वेळ आली तर खर्च करायचा कुठून असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत होत आहेत, परंतु त्याचा फायदा ठराविक लाभार्थ्यांनाच मिळत आहे.

 राज्य शासनाने कोरोना काळात वैद्यकीय सेवा कमी पडणार नाही, याची पुरेपुर दक्षता घेतली आहे, यापुढेही घेतील यात शंका नाही. परंतु नागरिकांच्या भावनांचा विचार करुन महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या खर्चाची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवावी, अशी विनंती संभाजी कदम यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या