Ticker

6/Breaking/ticker-posts

.. म्हणून सचिन वाझेंनी अँटिलियाबाहेर ठेवली स्फोटके; 'या' दाव्यानं खळबळ

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाजवळ गाडीत स्फोटके ठेवण्यामागे व व्यापारी मनसुख हिरन यांची हत्या करण्यामागे सचिन वाझेचा खटाटोप स्वत:ची सुपरकॉप’ ही प्रतिमा तयार करण्यासाठी होता, असा खळबळजनक आरोप राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) यासंबंधी विशेष एनआयए न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात केला आहे.

एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात या संपूर्ण कटाचा उलगडा केला आहे. स्फोटके ठेवण्यासाठी बडतर्फ सह पोलिस निरीक्षक सचिन वाझेने जाणूनबुजून हिरन यांच्या गाडीची निवड केली. हिरन हे या कटातील कमकुवत दुवा असतील, हे वाझेने ओळखले होते. मात्र प्रकरण उलटू लागल्यावर निवृत्त पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना हिरन यांची हत्या करण्यासाठी कटात सामावून घेतले गेले, असे एनआयएने म्हटले आहे.

'श्रीमंत व समृद्ध लोकांमध्ये स्वत:ची दहशत निर्माण करणे, त्यानंतर त्यांना भयभीत करून त्यांच्याकडून खंडणी उकळणे व तो पैसा गुन्ह्यांसाठी वापरणे, या उद्देशाने वाझे याने अन्य आरोपींच्या सहाय्याने हा सर्व कट रचला. त्याचा उद्देश संपूर्ण कटात स्पष्ट दिसतो', असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

'गाडीत स्फोटके ठेऊन तिथे चिठ्ठी ठेवणे व त्यावर पुढीलवेळी स्फोट नक्की होईल, असे लिहिणे, हे वाझेचा सुपरकॉप म्हणून स्वत:ची प्रतिमा तयार करण्याचा डाव होता, हे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच त्याने स्वत:च स्फोटके ठेवून स्वत:च या प्रकरणाचा तपास केला. कट बाहेर येऊ नये, यासाठी पुराव्यांची फेरफार केली. ठरवून हिरन यांची हत्या घडवून आणली. हा सर्व एका मोठ्या सुनियोजित कटाचा भाग होता व त्याचा म्होरक्या वाझे हाच होता. त्याला इतरांनी सहकार्य केले', असे एनआयएने या आरोपपत्रात नमूद केले आहे.

या आरोपपत्रात विनायक शिंदे, नरेश गोर, रियाझुद्दीन सिद्दीकी, सुनील माने, आनंद जाधव, सतीश मोठकुरी, मनिष सोनी व संतोष शेलार हे अन्य आरोपी आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या