Ticker

6/Breaking/ticker-posts

'नगर जल्लोष’कडून पद्मश्री पवार, आ. जगताप व मुख्याधिकारी पवार यांना 'चेंज मेकर्स' पुरस्कार

 कोरोनावर नियंत्रनासाठी लशीकरणाचा वेग वाढवून शासकीय नियमांचे पालन करायलाच हवे - पोपटराव पवार




लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर - सध्या कोरोना काळ सुरू आहे. या काळात आज आपण जे अनुभव घेत आहोत, कमी अधिक फरकाने जगातील प्रत्येकजण हे अनुभवत आहे. केंद्र सरकारने कोविड१९ ची मोफत लस उपलब्ध करून दिली असून, राज्य सरकारच्या प्रयत्नातून अधिकाधिक नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जितके मोठ्या प्रमाणात लशीकरण होईल, तितके आपण लवकर कोरोनावर नियंत्रण मिळवू. त्यासाठी प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे. कोरोना नियंत्रणात आणायचा असेल, तर लशीकरण व कोरोना नियमांचे पालन करायलाच हवे,  असे प्रतिपादन राज्याच्या आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. 

नगर जल्लोष ट्रस्ट सामाजिक भावेनतून चांगले काम करीत असलयाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. नगर जल्लोष ट्रस्ट परिवाराच्या वतीने राज्याच्या आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप व भिंगार कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांना चेंज मेकर्स पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी श्री. पवार बोलत होते. 

यावेळी माजी नगरसेवक धनंजय जाधव, प्रा. अरविंद शिंदे, अमोल बागूल, ट्रस्टचे सागर बोगा, पल्लवी बोगा, दीपक गुंडू, अजय म्याना, श्रीनिवास इप्पलपेल्ली, योगेश म्याकल, योगेश ताटी, शुभम बुरा आदी उपस्थित होते. पुरस्कारार्थींना शिल्प-चित्रकार बालाजी वल्लाल यांनी साकारलेली चांदबीबी महालाची प्रतिकृती भेट देण्यात आली.

आ. संग्राम जगताप म्हणाले की, नगर जल्लोष ट्रस्ट ही संस्था समाजासाठी व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. संस्थेच्या माध्यमातून तरुणांनी एकत्र येऊन वेगळे काही तरी करून दाखविले आहे. कोरोनाच्या या काळात प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यायला हवी. शासन नियमांचे पालन करायला हवे. अजूनही कोरोना हद्दपार झालेला नाही, हे लक्षात ठेवावे. कोविड 19च्या लशीकरणात शहर अग्रेसर आहे. 100% शहरातील नागरिकांचे लशीकरण व्हावे, यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.

श्री. विद्याधर पवार म्हणाले की, जवळजवळ दीड वर्षांपेक्षा अधिक काळ आपण कोरोनाबरोबर जगत आहोत. या काळात सर्वच शासकीय विभाग अहोरात्र परिश्रम घेत आहेत. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. जीव धोक्यात घालून अनेक आरोग्य कर्मचारी काम करीत आहेत. नागरिकांच्या सहकार्याशिवाय कोरोनाला आपण हद्दपार करू शकत नाही. शासकीय नियमांचे तंतोतंत पालन व्हायला हवे. लशीकरण अजून वेगात व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करून मास्क वापरणार्‍यांचे प्रमाणात आता तुलनेत कमी झाले असून, याबाबत पुन्हा एकदा नागरिकांमध्ये जनजागृती करून नियम अधिक कडक करण्याची गरज आहे. नाही तर तिसरी लाट आल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

ट्रस्टचे सागर बोगा म्हणाले की, नगर जल्लोष ट्रस्टची स्थापना ही समाजाचे आपण काही देणे लागतो, या भावनेतून करण्यात आलेली आहे. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणार्‍या अनेकांना आतापर्यंत आम्ही गौरविले असून, त्यांचा उत्साह वाढविला आहे. त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम आम्ही करीत आहोत. संकट कुठलेही असो हे सामाजिक व सांस्कृतिक काम असेच निरंतरपणे सुरू राहील, असे ते म्हणाले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी ट्रस्टचे उपाध्यक्ष रत्नाकर श्रीपत, कार्याध्यक्ष राकेश बोगा, सचिन बोगा, संतोष दरांगे, अक्षय अंबेकर, गणेश साळी, रोहित लाहोर, नीलेश मिसाळ, सुनील मानकर, प्रशांत भंडारी, विकास जाधव, विराज म्याना, ज्ञानेश्‍वर भगत, राहुल आडेप, अक्षय हराळे, अमोल तांबे, राजेंद्र निफाडकर, आसीफ शेख, आदित्य फाटक, प्रशांत विधाते, अक्षय धाडगे, इरफान शेख, अभिजीत ताठे, अजय दिवटे आदींनी परिश्रम घेतले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या