Ticker

6/Breaking/ticker-posts

‘हा’ जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर: ‘नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कामासाठी अनेक अडचणी आल्या. त्यावर मात करून आधी पुनर्वसन मग धरण हा आदर्शवत प्रकल्प आपण राबविला. निळवंडे धरण पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी देणे हा आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असणार आहे,’ असे सांगत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या धरणाच्या कामासंबंधीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

भंडारदरा धरण साखळीत येणाऱ्या निळवंडे प्रकल्पाचे काम अनेक वर्षे विविध टप्प्यांवर रखडले आहे. थोरात गेल्या अनेक वर्षांपासून या कामाचा पाठपुरावा करीत आहेत. आता या प्रकल्पातील कामे वेगाने सुरू झाल्याने प्रकल्प पूर्ण होण्यासंबंधी आशा पल्ल्वीत झाल्या आहेत. संगमनेर तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना थोरात यांनी या कामाबद्दल माहिती देत आपल्या मनातील भावनाही व्यक्त केल्या.

थोरात म्हणाले, ‘निळवंडे धरण व कालव्यांची कामे आपल्या हातून होणे हे नियतीच्याच मनात होते. म्हणून पुन्हा सत्तेत आल्यानंतर या कामाला गती दिली. २०२२ च्या मध्यापर्यंत दुष्काळी भागाला पाणी देण्याचा आपला प्रयत्न आहे. यासाठी कालव्यांची कामे अत्यंत जलद गतीने सुरू आहेत. निळवंडे धरण पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी देणे हा आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असणार आहे. या धरणासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. अनंत अडचणींवर मात करत धरण पूर्ण केले. कालव्यांसाठी मोठ्या बोगद्यांची कामे मार्गी लावली. मात्र मागील भाजप सरकारच्या काळात पाच वर्षे कामे थांबली होती. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर जेथे कालव्यांच्या कामावर दोन जेसीबी कार्यरत होते तेथे आता ३५ जेसीबी रात्रंदिवस काम करत आहेत. दोन्ही कालव्यांची कामे अत्यंत वेगाने सुरू आहेत.

अडचणी येतात त्यावेळी चर्चेने आपण मार्ग काढून कामे सुरू ठेवतो. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करून २०२२ च्या मध्यापर्यंत या भागाला पाणी देणे हा आपला ध्यास आहे. तालुक्यातील जनतेने आपल्यावर खूप प्रेम केले आहे. पक्षानेही मोठा विश्वास टाकला आहे. आपण अडचणीच्या काळात प्रदेशाध्यक्षपद सांभाळताना पक्षाला मोठे यश मिळवून दिले. महसूलमंत्री पदाची मोठी जबाबदारी आहे. तरीही तालुक्यातील सहकारी संस्था व गावांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. सातत्याने काम करतो. त्यामुळे संगमनेरचा लौकिक राज्यात निर्माण झाला आहे. या परिसरातून हैदराबाद सुरत मार्ग जातो आहे. समृद्धी महामार्ग जवळ आहे. रेल्वेमार्ग जातो आहे. विमानतळ जवळ आहे,’ असेही ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या