लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून इन्कम टॅक्स रिटर्न अर्थात
आयकर परतावा दाखल करण्याची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात येत असल्याची घोषणा
करण्यात आलीय. यामुळे करदात्यांना दिलासा मिळाला असला तरी ही तारीख डिसेंबर २०२१
पर्यंत का पुढे ढकलण्यात आली? असा
प्रश्न नक्कीच अनेकांच्या मनात आला असेल...
तांत्रिक
कारणामुळे निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार, इन्कम टॅक्सच्या नव्या वेबसाईटवर करदात्यांना अनेक अडचणी येत आहे. ७ जून रोजी लॉन्च करण्यात आल्यानंतर या वेबसाईटमध्ये काम करण्यात अनेक अडथळे जाणवत आहेत.
करदात्यांना या अगोदर १५ सप्टेंबरपर्यंत इन्कम टॅक्स
रिटर्न फाईल करणं गरजेचं होतं. मात्र, आता ही तारीख ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आलीय.
'इन्फोसिस'चा भोंगळ कारभार
इन्कम टॅक्सचं हे नवं पोर्टल 'इन्फोसिस'कडून तयार
करण्यात आलंय. वेबसाईटवरच्या तांत्रिक समस्यांची दखल अगोदरच अर्थमंत्री निर्मला
सीतारामन यांनीही घेतलीय. निर्मला
सीतारामन यांनी गेल्या महिन्यात 'इन्फोसिस'चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सलील
पारेख यांची स्वतःच्या कार्यालयात भेट घेतली होती. यावेळी सीतारामन यांनी पारेख
यांना इन्कम टॅक्सच्या नव्या वेबसाइटच्या नित्यनवीन गोंधळांबाबत स्पष्टीकरण
विचारलं होतं. यावेळी इन्फोसिसकडून ‘ वर्क इन प्रोग्रेस’
असल्याचं उत्तर दिलं.
यावर, १५ सप्टेंबरपर्यंत सर्व दोष काढून टाकायला हवेत, अशी
तंबी सीतारामन यांनी इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांना दिली. केंद्रीय अर्थ
मंत्रालयाकडून याबाबत काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात, सीतारामन
यांनी पारेख यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं म्हटलं होतं. आयकर विभागानं
नव्या स्वरूपातील वेबसाइट सुरू करून अडीच महिने झाल्यानंतरही ही वेबसाइट धडपणे
चालत नसल्याबद्दल अर्थमंत्र्यांनी पारेख यांना खडसावलं. 'इन्फोसिसने
मान्य केलेल्या सेवा देण्यास कंपनीकडून अक्षम्य दिरंगाई झालेली आहे. त्यामुळे
प्राप्तिकराची वेबसाइट त्वरित सुरळित करण्यासाठी कंपनीनं आवश्यक तेवढे मनुष्यबळ
आणि स्रोत कामाला लावावेत. इन्फोसिसकडून ७५० जण प्राप्तिकर विभागाची वेबसाइट
सुरळीत करण्यासाठी झटत असून यावर कंपनीचे सीओओ प्रवीण राव लक्ष ठेवून आहेत',
अशी माहिती सलील पारेख यांनी दिली होती.
तसंच सीबीडीटीनं कंपन्यांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची तारीख ३० नोव्हेंबर २०२१ वरून पुढे ढकलत १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत वाढवली आहे. उशिरा आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीखही ३१ मार्च २०२२ करण्यात आलीय.
सोबतच सीबीडीटीनं टॅक्स ऑडिट रिपोर्ट आणि ट्रान्सफर
प्रायसिंग सर्टिफिकेट दाखल करण्याची मुदतही क्रमश: ३१ ऑक्टोबर आणि ३० नोव्हेंबर
२०२१ पासून वाढवत क्रमश: १५ जानेवारी २०२२ आणि ३१ जानेवारी २०२२ पर्यंत पुढे नेलीय.
0 टिप्पण्या