Ticker

6/Breaking/ticker-posts

आता ... ऑनलाईन लाच ; दोघांना अटक

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

पुणे : हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर त्यांनी त्यांच्या खात्यावर ऑनलाईन ५० हजार रूपये पाठविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोघांवर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. लाच देणाऱ्यांवर केलेली ही वर्षातील पहिली कारवाई ठरली.

दत्तात्रय हिरामण पिंगळे (वय २३, रा. देऊळगांवगाडा, ता. दौंड) आणि अमित नवनाथ शिंदे (वय २९, रा. कमलविहार, मांजरी बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तृप्ती कोलते या हवेली तालुक्याच्या तहसीलदार आहेत. सोलापूर रस्त्यावर १३ सप्टेंबर रोजी शेवाळेवाडी फाटा परिसरात अवैध वाळू वाहतूक करताना ट्रक मिळाला होता. त्याच्यावर कोलते यांनी कारवाई कारवाई सुरू केली. त्यावेळी वाहन मालक पिंगळे याने त्यांना लाचेचे प्रलोभन दिले. त्यावेळी कोलते यांनी स्पष्टपणे त्याला नकार दिला. तरीही आरोपी पिंगळे याने शिंदे याला तहसीलदार यांच्या गुगल पेवर पैसे जमा करण्यास सांगितले.

कोलते यांच्या परवानगी शिवाय आरोपीनी गुगल पेचा वापर करत पहिल्यांदा एक रुपया ट्रान्सफर केला. तो योग्य प्रकारे गेल्याची खात्री झाल्यानंतर ५० हजार रूपये कोलते यांच्या खात्यावर पाठविले गेले. कोलते यांना ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाण्यात लेखी कळविले होते. तसेच, याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार लोकसेवकाला लाच दिल्याच्या आरोपावरून खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी सहायक पोलिस आयुक्त सीमा आडनाईक या अधिक तपास करत आहेत.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या