Ticker

6/Breaking/ticker-posts

लवकरच तिसरी घंटा ! २२ ऑक्टोबरपासून राज्यातील नाट्यगृहे, सिनेमागृहे सुरू

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबई : राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हॉटेल, मॉल, मंदिरं यांसह अनेक सार्वजनिक ठिकाणं निर्बंधांसह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या सगळ्यात चित्रपटगृह आणि नाट्यगृहांना परवानगी देण्यात आली नव्हती. यावरून अनेक कलाकारांनी प्रश्नही उपस्थित केले होते. अखे आता मनोरंजन क्षेत्रातील प्रतिनिधींच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरू करण्याला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. २२ ऑक्टोबरपासून नाट्यगृह सुरू करण्यात येतील.

 राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव यांनी बैठकीत स्पष्ट केले. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल.

आज टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली. इतर सार्वजनिक ठिकाणांप्रमाणेच चित्रपटगृह आणि नाट्यगृहांसाठीही खास नियमावली असेल.

यात मास्क लावणं, सॅनिटायझेशनसह अनेक गोष्टींचा समावेश असेल. दरम्यान २२ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या चित्रपटगृहात किती टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात येईल याची अजून स्पष्टता केलेली नाही. तरीही सुरुवातीच्या दिवसांमध्ये ५० टक्क्यांच्या मर्यादेसह चित्रपटगृह सुरू करण्यात येतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या