लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
वॉशिंग्टन: करोनाप्रतिबंधक लशी घेतलेल्या देशवासीयांना २० सप्टेंबरपासून बूस्टर डोस
देण्याची योजना अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी आखली आहे. परंतु, या योजनेत सध्या काही अडचणी निर्माण झाल्याचे दिसत आहे. यापूर्वी मॉडर्ना
लशी घेतलेल्या नागरिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे, असे
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
बायडेन यांनी गेल्या
महिन्यात प्रशासन बूस्टर डोस देण्याबाबतचे नियोजन करीत असल्याचे जाहीर केले होते.
मात्र, याला रोग नियंत्रण केंद्र (सीडीसी) आणि अन्न
आणि औषध प्रशासनाकडून (एफडीए) अद्याप मंजुरी मिळालेली नाही. दुसरा डोस घेतल्यानंतर
आठ महिन्यांनी बूस्टर डोस घेण्याचे बायडेन यांनी सुचवले होते. मॉडर्ना लस उत्पादित
करणाऱ्या कंपनीने तिसऱ्या डोसच्या मंजुरीसाठी आवश्यक असलेली पुरेशी माहिती ‘एफडीए’ आणि ‘सीडीसी’ला दिलेली नाही. ‘ एफडीए’ने
अतिरिक्त माहिती मागितली असल्याने बूस्टर डोस देणे ऑक्टोबरपर्यंत लांबणीवर पडू
शकते.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, ‘एम यू
प्रकारचा विषाणू ब्रिटन, युरोप, अमेरिकेचा
काही भाग आणि हाँगकाँगमध्ये आढळला. या नव्या विषाणूवर आरोग्यतज्ज्ञ लक्ष ठेवून
आहेत. त्यातील बदलही अभ्यासले जात आहे. या विषाणूचे जगातील एकूण करोनारुग्ण ०.१
टक्केच आहेत. कोलंबिया आणि इक्वाडोर येथे प्रत्येकी ३९ आणि १३ टक्के रुग्ण नव्या
प्रकारच्या विषाणूचे आढळत आहेत. करोनाचा हा नवा विषाणू ३० ऑगस्ट रोजी जागतिक
आरोग्य संघटनेच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या विषाणूचे रुग्ण जगभरात
३९ देशांमध्ये आढळले असून, या विषाणूमध्ये गेल्या काही
दिवसांत सातत्याने बदल होत असल्याचे दिसून आले आहे.
0 टिप्पण्या