Ticker

6/Breaking/ticker-posts

सोमय्यांच्या पारनेर दौऱ्याकडे लक्ष ?; राष्ट्रवादीने घेतली 'ही' भूमिका

 




लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर: कराडमधील घोषणा केल्याप्रमाणे भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या आज (गुरुवारी) पारनेरला येत आहेत. पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीत गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर अधिक तपशील घेण्यासाठी ते येथे येणार आहेत. कोल्हापुरातून त्यांना जसा विरोध झाला, तसा पारनेरमध्ये होतो काय याकडे लक्ष लागले आहे.

मात्र, पारनेर कारखान्याच्या बाबतीत वेगळी परिस्थिती असल्याने आणि राष्ट्रवादीकडूनही वरिष्ठ पातळीवरून सोमय्यांसंबंधी दुर्लक्षाची भूमिका घेण्याचे संकेत मिळाल्याने पारनेर दौऱ्यात त्यांना विरोध होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, पोलिसांनी मोठ्या बंदोबस्ताची तयारी ठेवली आहे.


संशयास्पद विक्री व्यवहार झाल्याचा आरोप काही कारखान्यांवर आहे. या यादीत पारनेरच्या साखर कारखान्याचाही समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी खासदार विदुरा नवले यांच्या अधिपत्याखालील क्रांती शुगर या कंपनीने पारनेरचा कारखाना विकत घेतला आहे. बँकेने हा कारखाना एकाच विक्री निविदेला कसा विकला? असा प्रश्न उपस्थित करून ही चौकशीची मागणी करण्यात येत आहे. यासाठी पाठपुरावा करणारे याचिकाकर्ते बबनराव कवाद, रामदास सालके आणि रामदास घावटे यांनी मुंबई येथे ईडीच्या कार्यालयात जाऊन यासंबंधीचे पत्र तेथील अधिकाऱ्यांना दिले. चौकशी सुरू झाली नाही तर २० ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांसह ईडी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यानंतर सोमय्या यांची भेट घेऊन लक्ष घालण्याची विनंती केली. त्यानुसार सोमय्या गुरुवारी पारनेरला येत आहेत. दुपारी साडेबारा वाजता ते पारनेर कारखाना अर्थात क्रांती शुगर, देविभोयरे येथे भेट देणार आहेत. त्यानंतर तेथेच दुपारी एक वाजता शेतकरी, सभासद आणि कामगारांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर पारनेरला येऊन पत्रकार परिषद घेणार आहेत, असा दौरा सोमय्या यांच्या कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी शांत?

कोल्हापूरमध्ये झाला तसा विरोध पारनेरमधून होण्याची चिन्हे नाहीत. त्याचे कारण एक तर राष्ट्रवादीने आता सोमय्या अधिक चर्चेत राहू नयेत, यासाठी थेट विरोधाची भूमिका न घेण्याचे ठरविल्याचे समजते. शिवाय ज्या प्रश्नासाठी सोमय्या येत आहेत, तो पारनेरकरांच्या जिव्हाळ्याचा आहे. या कारखान्याचा विक्री व्यवहार तालुक्यातील बहुतेक शेतकरी आणि नेत्यांनाही मान्य नाही. मधल्या काळात कारखाना प्रशासनाकडून शेतकऱ्यांना त्रासही झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच आमदार लंके यांच्या पुढाकारातून हा कारखाना क्रांती शुगरकडून परत घेऊन पुन्हा शेतकऱ्यांच्या मालकीचा सहकारी कारखाना करण्याच्या हालचाली सुरू आहेत. याला खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही संमती मिळत असल्याचे सांगण्यात येते. असे असले तरी राष्ट्रवादीच्या मतदारसंघात येऊन सोमय्या पवार कुटुंबियांवर टीका करण्याची संधी सोडणार नाहीत.

अण्णांच्या भेटीची शक्यता धुसर..

सोमय्या यांच्या दौऱ्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीसंबंधी उल्लेख नाही. मात्र, ज्या प्रकरणाशी संबंधित त्यांचा दौरा आहे, ही प्रकरणे सुरुवातीला हजारे यांनी समोर आणून त्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू केली आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यात आल्यावर सोमय्या हजारे यांची भेट घेतील असा काही जणांचा अंदाज आहे. मात्र, असे असले तरी हजारे यांच्याकडून त्यांना भेटीसाठी वेळ दिली जाण्याचीही शक्यता कमीच आहे. त्यामुळे या दोघांची भेट होण्याची शक्यता धुसर आहे. सोमय्या यांनी घेतलेल्या भूमिकेसंबंधी हजारे यांनीही अद्याप काहीही भाष्य केलेले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या