Ticker

6/Breaking/ticker-posts

ऊसतोड कामगारांना योजनांचा लाभ !; 'तो' शासन निर्णय जारी होताच मुंडे म्हणाले...

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबई: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लोकनेते गोपिनाथ्रराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्यक्ष ऊसतोड कामगारांना देता यावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांची नोंदणी ग्रामसेवकामार्फत करून त्यांना ओळखपत्र देण्याचा शासन निर्णय बुधवारी निर्गमित करण्यात आला आहे. कुठल्याही दस्त ऐवजात 'ऊसतोड कामगार' अशी नोंदणी नसलेल्या लाखो असंघटित ऊसतोड कामगारांना यामुळे खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

याबाबतचा शासन निर्णय व सोबतच नोंदणी करावयाचा नमुना फॉर्म व ओळखपत्राचा नमुना देखील निर्गमित करण्यात आला असून, प्रत्येक जिल्ह्यात ग्रामसेवकामार्फत ही नोंदणी पूर्ण केली जाणार आहे. सदर नोंदणी यावर्षीच्या हंगामाला कामगार स्थलांतरीत होण्यापूर्वीच केली जावी; नोंदणी करताना स्थानिक राजकारण, गाव स्तरावरील गटबाजी किंवा पक्षपात अशा कोणत्याही बाबीचा परिणाम नोंदणीवर न होऊ देता पारदर्शक पद्धतीने सरसकट ऊसतोड कामगारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र दिले जावे, अशा स्पष्ट सूचना ना. मुंडे यानी केल्या आहेत.

ऊसतोड कामगारांचे नाव, आधार कार्ड, फोटो, बँक खाते, रेशन कार्ड यांसारख्या काही कागदपत्रांची या नोंदणी प्रक्रियेसाठी आवश्यकता भासणार आहे. तसेच ज्या ऊसतोड कामगारांनी अलीकडच्या काळात ऊसतोडणीचे काम बंद केले मात्र पूर्वी ते ऊसतोडणी करत होते, अशा कामगारांचीही नोंदणी याद्वारे करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. महामंडळांतर्गत संत भगवान बाबा वसतीग्रुह योजना, आरोग्य विमा या व यांसारख्या अन्य योजनांचा लाभ देण्यासाठी ऊसतोड कामगार नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देणे गरजेचे आहे. यासाठी संकलित केलेली माहिती संपूर्ण संगणकीकृत करून एका अॅपद्वारे नोंदणी व ओळखपत्र प्रक्रिया आणखी सुलभ करण्यात येणार आहे. ऊसतोड कामगार बांधवांनी आवश्यक माहिती व कागदपत्रे वेळेत ग्रामसेवकांकडे जमा करून आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन मुंडे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या