Ticker

6/Breaking/ticker-posts

जि. प. उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी नगर बाजार समितीच्या सत्ताधा-यांवर डागली तोफ

 


 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नगर:  माजी खासदार (कै.) दादा पाटील शेळके यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी सहकारी संस्था स्थापन केल्या. मात्र आताच्या सत्ताधा-यांकडून जागा दिसली की विकली अशी परिस्थिती आहे. सुस्थितीत सुरु असलेल्या नगर तालुका दूध संघाची जागा विकली. आता त्यांचे नाव दिलेली नगर बाजार समितीची तशीच अवस्था आहे. मतदारांनो निवडणुकीत चिरीमिरी घेऊन मतदान केले तर पुढच्या पाच वर्षात नगर बाजार समितीची जागा विकलेली दिसेल. त्यामुळे शेतकरी सभासदांनीच आता बाजार समिती ही संस्था वाचवायला पुढे यावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांनी केले.

 नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला सहकार खात्याने काढलेल्या नोटीस संदर्भात व सत्ताधारी कर्डिले गटाने महाविकास आघाडीवर केलेल्या आरोपा संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  यावेळी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, शरद झोडगे, पंचायत समितीचे उपसभापती डॉ. दिलीप पवार, युवा नेते संदीप गुंड, माजी सभापती रामदास भोर, रवी भापकर, नगर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संपतराव म्हस्के, बाजार समितीचे माजी सभापती माणिकराव गुंजाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 शेळके म्हणाले, की दादा पाटील शेळके यांनी कधी स्वार्थ पाहिला नाही. नगर शहरातील २८ एकर जागेवर त्यांनी बाजार समिती उभी केली. त्यावेळी त्यांच्या मनात स्वार्थ असता तर त्यांनी स्वतः जागा खरेदी करून ठेवली असती. आता मात्र नेप्ती उपबाजाराच्या परिसरात सत्ताधा-यांच्या जागा दिसतील. शेतकऱ्यांच्या मालकिच्या सावेडी रस्त्यावरील दूध संघाची जागा या सत्ताधाऱ्यांनी विकली. दादा पाटलांना संस्था उभ्या करायला ४० वर्ष लागले. आता सत्ताधा-यांकडून सहानुभुती मिळवण्यासाठी दादा पाटलांचे नाव देऊन कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरु आहे. यामुळे त्यांच्या आत्म्याला नक्कीच दुःख होईल.

 बाबासाहेब गुंजाळ म्हणाले, की दादा पाटलांच्या काळात आम्ही एकही एकही महिन्याचा पगार थकित होऊ देत नव्हतो. पदोन्नती योग्य रीतीने दिल्या जात होत्या. आता मात्र सेवा ज्येष्ट्ता डावलून पदोन्नत्या दिल्या जात आहेत. संदेश कार्ले म्हणाले, की सत्ताधा-यांनी आमच्या निष्ठेबद्दल बोलू नये. शिवसेनेचे संपर्कप्रमुख व जिल्हाप्रमुखांशी आमची निष्ठा असल्याने आम्ही त्यांच्या संपर्कात असतो. आम्ही त्यांच आदेश पाळणारे शिवसैनिक आहोत. पक्ष बदलणाऱ्या चोरांना आमच्या बद्दल बोलण्याचा अधिकार नसल्याचे कार्ले यांनी सांगितले. 

 बाळासाहेब हराळ म्हणाले,  भाजपची सत्ता असतांना सन २०१७-१८ साली पणन संचालकांनी तयार केलेला  चौकशी अहवाल त्यांनीच दाबून ठेवला होता. त्यामुळे सत्तेचा दुरुपयोग त्यांनीच केला आहे. मी काँग्रेसमध्येच आहे. त्यांनी मात्र विधान परिषद निवडणुकीत भाजप मध्ये राहून व्याह्याला मदत केली.   सेस बुडवला नाही, कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचा अडीच ते तीन कोटी रुपये लुबाडले नाहीसहावा वेतन आयोगाचा फरक याबाबत बोलावे आम्ही निवडणुकीतून माघार घेऊ असे प्रतिआव्हान दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या