Ticker

6/Breaking/ticker-posts

ठाकरे सरकारकडून सूडबुद्धीने शेतकऱ्यांची वीजतोडणी ! -अरुण मुंढे यांचे टीकास्त्र

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नगर : वीजबिल थकबाकी वसुलीसाठी आता महावसुली सरकारने राज्यातील गरीब व मध्यमंवर्गीयांच्या खिशावर डल्ला मारण्यास सुरुवात केली असून गरीब वीज ग्राहकांच्या घरात अंधार पसरविण्याचे कारस्थान आखले आहे. बड्या वीजग्राहकांच्या आणि सरकारी कार्यालयांच्या कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीकडे दुर्लक्ष करून गरीब कुटुंबांची वीज कापणाऱ्या ठाकरे सरकारने आपला जनताविरोधी चेहरा पुन्हा उघड केला आहे, अशी टीका भाजपचे जिल्हा अध्यक्ष अरुण मुंढे यांनी केली आहे. 

 प्रसिद्धी पत्रकाद्वारे मुंढे यानी या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.  राज्यातील सरकारी कार्यालये, ग्रामपंचायती, पाणीपुरवठा योजना, मंत्र्यांचे बंगले, साखर कारखाने, खाजगी फार्म हाऊसमधील वीजबिलांच्या थकबाकीने उच्चांक गाठला असताना त्याकडे दुर्लक्ष करून दुष्काळ, अतिवृष्टी, कोरोनाकाळातील टाळेबंदीमुळे अगोदरच कंबरडे मोडलेल्या शेतकरी व गरीब कुटुंबांची ठाकरे सरकारने फसवणूक केली आहे. धनिक थकबाकीदारांसाठी अभय योजनाराबविणाऱ्या आघाडी सरकारने गरीब शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, असा आरोपही त्यांनी केला.

  दुष्काळ, अतिवृष्टी, वादळांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी हवालदील झाला आहे, तर कोरोनाकाळातील टाळेबंदीमुळे सामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मार्च महिन्यात विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारला जाब विचारल्यानंतर कृषीपंप आणि घरगुती ग्राहकांच्या वीज तोडणीची कारवाई थांबविण्याचे आश्वासन देण्यात आले, पण अधिवेशनानंतर पुन्हा वीजतोडणीची कारवाई सुरू करून सरकारने सामान्य जनतेचा विश्वासघात केला. फडणवीस सरकारच्या काळात वीजग्राहकांच्या समस्या लक्षात घेऊन थकबाकी वसुली थांबविली व वीज मंडळास आर्थिक साह्यदेखील केले. तरीही, संपूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत वीजबिल भरू नका, असा सल्ला देत शरद पवारांसारखे नेते त्या काळात जनतेस भडकावत होते.

  आता त्यांच्याच आशीर्वादाने ठाकरे सरकारने वसुलीसाठी कारवाई करून लाखो कुटुंबांना वेठीस धरले आहे, अशी टीका भाजपा चे जिल्हाध्यक्ष श्री.अरुण मुंढे  यांनी केली. एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील आंदोलनांना पाठिंबा द्यायचा व दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांची वीज तोडायची हा महावसुली सरकारचा दुटप्पीपणा जनतेने आता ओळखला असून तो त्वरित थांबविला नाही तर जनतेच्या रोषास सामोरे जाण्याची तयारी ठेवा असा इशाराही मुंढे यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या