Ticker

6/Breaking/ticker-posts

ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास..! 'हा नवा भारत आहे'; PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहास रचला आहे. चार दशकांनंतर टीम इंडियाला हॉकीमध्ये पदक मिळाले असल्याने भारतीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. जर्मनीसारख्या तगड्या संघाला हरवून भारतीय संघाने कांस्य पदक पटकावले. हॉकीतील या ऐतिहासिक विजयानंतर देशभरात उत्सवाचे वातावरण आहे आणि प्रत्येकजण टीम इंडियाचे अभिनंदन करत आहे.

पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ''प्रफुल्लित भारत! प्रेरित भारत! गर्वित भारत! टोकियोमधील हॉकी संघाचा नेत्रदीपक विजय हा संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद क्षण आहे. हा नवा भारत आहे, आत्मविश्वासाने भरलेला भारत. हॉकी संघाचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा.''

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळी योग न करता भारतीय संघाचा हा महत्त्वाचा सामना पाहिला होता. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही टीम इंडियाला विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. राहुल गांधींनी ट्विटमध्ये लिहिले की, 'भारतीय पुरुष हॉकी संघाचे खूप खूप अभिनंदन. देशासाठी हा खूप मोठा क्षण आहे, एक मोठा विजय आहे.'

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही ट्विट करून भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. शहा यांनी म्हटले आहे की, 'टीम इंडियाला शुभेच्छा, पुरुष हॉकी संघाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळणे ही खूप अभिमानाची बाब आहे.'


केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही भारतीय संघाचे अभिनंदन केले. ठाकूर म्हणाले की, 'मुलांनी करून दाखवलं, अशा विजयानंतर आम्ही शांत राहू शकत नाही. टीम इंडियाने चमकदार कामगिरी करत इतिहासात आपले नाव नोंदवले आहे.'

दरम्यान, तब्बल 41 वर्षांनंतर भारतीय हॉकी संघाला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाले आहे. 1980  नंतर भारतीय हॉकीची वाईट परिस्थिती होती, पण यावेळी टीम इंडियाने सर्वांना आश्चर्यचकित केले आणि कांस्यपदक जिंकलं आहे.

एकावेळी भारतीय संघ जर्मनीविरुद्ध 1-3 असा पिछाडीवर होता, पण सात मिनिटांत चार गोल करत भारतीय खेळाडूंनी सामन्याची दिशाच बदलून टाकली. भारताने 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये शेवटचे सुवर्णपदक जिंकले होते. कांस्यपदकाबद्दल बोलायचे झाले, तर भारताने 1968च्या मेक्सिको सिटी आणि 1972च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये नेदरलँड्सचा पराभव करत पदक जिंकले होते. हे भारताचे तिसरे कांस्यपदक ठरले आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या