Ticker

6/Breaking/ticker-posts

तालिबान्यांना एकाकी पडण्याची भीती; भारताला केले 'हे' आवाहन ! भारताचे 'वेट अॅण्ड वॉच'

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

काबूल/दोहा: अफगाणिस्तानमधून अमेरिकन फौजांच्या संपूर्ण माघारीसाठी काही तास शिल्लक आहेत. तालिबानकडून सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू असून दुसरीकडे इतर देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध स्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतासोबत व्यापार-आर्थिक संबंध पूर्वीप्रमाणेच हवे असल्याचे तालिबानचा वरिष्ठ नेता शेर मोहम्मद स्टॅनेकझई याने म्हटले आहे. दिल्ली-काबूलदरम्यान कार्गो विमानसेवा पूर्ववत करण्याचे आवाहनही त्याने केले आहे.

तालिबानी राजवटीबाबत आंतरराष्ट्रीय समुदायात चिंतेचे आणि भीतीचे वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला आश्वासत करण्यासाठी शेर मोहम्मद स्टॅनेकझई याने व्हिडिओ संदेश प्रसिद्ध केला. पाकिस्तानमार्गे हवाई व्यापार खुला करण्याचे आवाहन त्याने केले.

तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर भारताने दूतावासातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुन्हा माघारी बोलावले होते. त्यामुळे तालिबान राजवटीसोबत भारताचे संबंध कसे असतील याबाबत चर्चा सुरू होती. तालिबानकडून ही इतर देशांसोबत चांगले संबंध आणि त्यांच्याकडून मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर तालिबानी नेत्याने भारताला आवाहन केले असल्याचे म्हटले जात आहे.

भारतासोबत व्यापार-आर्थिक संबंधाबाबत पहिल्यांदाच तालिबानच्या वरिष्ठ नेत्याने भाष्य केले आहे. शेर मोहम्मद स्टॅनेकझई याने भारतासोबत सांस्कृतिक आणि राजकीय मैत्रीलाही तालिबान महत्त्व देत असल्याचे म्हटले. त्याशिवाय भारत इराणमध्ये विकसित करत असलेल्या चाबहार बंदरालाच्या विकासकामांना तालिबानने पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान, भारताने तालिबानबाबत अद्याप अधिकृतपणे कोणतीही भूमिका घेतली नसल्याचे म्हटले जात आहे. सध्या भारताने 'वेट अॅण्ड वॉच'ची भूमिका घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

याआधी मागील वर्षीदेखील तालिबानने भारतासोबतच्या भूमिकेबाबत भाष्य केले होते. तालिबानचे प्रवक्ते सुहैल शाहीन याने म्हटले होते की, राष्ट्रहितासाठी आणि परस्परांच्या सन्मानासाठी आम्हाला भारतासह अन्य शेजारी देशांसोबतही सकारात्मक आणि चांगले संबंध हवे आहेत. अफगाणिस्तानच्या चांगल्या भविष्यासाठी या देशांचे सहकार्य हवे आहे. तालिबानची मोहीम ही अफगाणिस्तानमध्येच आहे. देशाबाहेर आम्हाला काहीही रस नसल्याचेही त्यांनी सांगितले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या