Ticker

6/Breaking/ticker-posts

नगर जिल्ह्यात पालघरची पुनरावृत्ती थोडक्यात टळली; जमावकडून गैरसमजातून हल्ला

 

*चोर समजून पोलीस अधिकाऱ्यासह चौघांवर हल्ला.

*जामखेड पोलीस ठाण्यात तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल.







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नगर: बीड जिल्ह्यातून कोंबड्या खरेदीसाठी नगर  जिल्ह्यात आलेल्या चौघांना जमावाने चोर समजून बेदम मारहाण केली. यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह त्याच्या नातेवाईकांचा समावेश आहे. काही गावकऱ्यांनी संयमाने परिस्थिती हाताळल्यामुळे पालघरची पुनरावृत्ती टळली. सरपंच आणि पोलीस घटनस्थळी पोहोचल्याने  चौघेजण बालंबाल बचावले.

 जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  जामखेड तालुक्यातील अरणगाव येथे भरदिवसा झालेल्या घरफोडीमुळे चिडलेल्या ग्रामस्थांनी या चौघांनाच चोर समजून पकडले होते.


यासंबंधी मिळालेली माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील आष्टी येथील कोंबडी व्यावसायिक विशाल कांबळे, त्यांचे नातेवाईक असलेले साहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांचे आणखी दोन नातेवाईक जामखेड तालुक्यात वंजारवाडी, फक्राबाद, अरणगाव या भागात गावरान कोंबड्या विकत घेण्यासाठी आले होते. तिथून पुन्हा ते गावाकडे निघाले होते. दरम्यान, अरणगाव परिसरातील वंजारवाडी येथे दिवसा घरफोडीची घटना घडली होती. त्यामुळे तेथील ग्रामस्थांना त्यांचा संशय आला.

अ्रनगाव येथे कांबळे यांच्या गाडीला वंजारवाडी येथील ग्रामस्थांनी पाठलाग करून अडविले. त्यानंतर कांबळे यांच्या गाडीवर मोठमोठे दगड मारण्यात आले. चौघांना गाडीतून खाली खेचले गेले. गज, काठ्या व दगडाने जबर मारहाण तसेच शिवीगाळ करण्यात आली. त्यांच्याकडील पन्नास हजार रुपये काढून घेतले. मारहाणीत त्यांचे कपडेही फाटले. मारहाणीत विशाल काबंळे, कचरू निकाळजे, सुनील निकाळजेकिरण कांबळे  जखमी झाले आहेत. 

यातील पोलीस अधिकारी कांबळे हे जमावाची समजून काढत होते. आपण पोलीस असून भावाच्या व्यवसायासाठी सुट्टी काढून आलो आहे. घाईगडबडीत ओळखपत्र आणलेले नाही. तुम्ही खात्री करून घ्या. आम्हाला मारहाण करू नका, अशी विनंती करीत त्या भागातील आपल्या काही ओळखीच्या लोकांचा संदर्भही देत होते. मात्र, संतप्त जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

 या घटनेची माहिती अरणगावचे सरपंच अंकुश शिंदे यांना समजली. त्यांनी तेथे जाऊन जमावाला शांत केले आणि चौघांची सुटका केली. जामखेड पोलिसांना याची माहिती देण्यात आली. जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी या चौघांची चौकशी करून त्यांना उपचारासाठी जामखेड येथील रुग्णालयात हलविले. 

सरपंच अंकुश शिंदे व काही ग्रामस्थांमुळे पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात विशाल कांबळे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सुमारे तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या