लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई: 'जबाबदारीला घाबरेल तो ठाकरे
कसला', असा सवाल करत तुमच्या साऱ्यांच्या आशीर्वादाने मी
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत आहे आणि यापुढेही सांभाळणार
आहे, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल व्यक्त केला.
मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी मार्मिकच्या वर्धापनदिनानिमित्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे
मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी जुन्या आठवणी जागवल्या व शिवसेना पक्षाची स्थापना कोणत्या उद्देशाने झाली हे पुन्हा एकदा सांगितले. '
मराठी माणूस लढ्यासाठी कधी मागे पुढे पहात नाही. अन्याय
करणाऱ्याच्या छाताडावर पाय देणारा मराठी माणूस आहे. मराठी माणसाच्या घरात
परप्रांतीय घुसू लागले म्हणून लढा सुरू झाला आणि त्यातूनच शिवसेना उभी राहिली. ही
मोठी लढाई खऱ्या अर्थाने व्यंगचित्रातून सुरू झाली. व्यंगचित्राच्या ताकदीवर उभी
राहिलेली शिवसेना ही एकमेव संघटना असून या संघटनेची कीर्ती जगात पोहचली आहे',
अशा भावना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केल्या.
नोकरी सोडा आणि व्यवसायाकडे वळा, हे सांगणे सोपे असते पण प्रत्यक्षात तसे
करणे कठीण असते. मात्र शिवसेनाप्रमुखांनी ते करून दाखवले, असे
सांगत दिवंगत बाळासाहेब यांनी सुरू केलेल्या मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकाचा प्रवास कसा आव्हानात्मक होता आणि शिवसेनेच्या स्थापनेची बीजं
त्या माध्यमातून कशी रोवली गेली, हे मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं. ' गेल्या ६० वर्षांचा इतिहास आहे. मला सगळ्या
गोष्टी आठवतायत. छापखाना छोटासा होता. तिथे मार्मिकची छपाई व्हायची. अनेक संकटं
आली. आणीबाणीचं एक विचित्र बंधन मार्मिकवर आलं होतं. मार्मिक प्रकाशन सुरू होतं,
पण प्रेसला बंदी होती. मार्मिक तेव्हा कोणीच छापायला तयार नव्हते.
पण या सगळ्यातून आव्हानाला सामोरं जाण्याचं बळ मिळालं. खरंतर मार्मिकने आम्हा
सगळ्यांनाच आत्मविश्वास दिला', असे मुख्यमंत्री ठाकरे
म्हणाले. ' अनेक संकटे येत असतात. या संकटांच्या छाताडावर
चालून जायचे असते', असे माझ्या आजोबांचे वाक्य होते. तोच
बाणा आम्ही पाळला आहे, असे नमूद करताना ठाकरे घाबरणारे नाहीत
तर लढणारे आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. ' माझा जन्म आणि मार्मिकचाही जन्म १९६० मधला. दोघांनाही नव्या रूपात तुमच्या
समोर यावं लागलंय', असे सांगताना 'तुमच्या
आशीर्वादाने नवी जबाबदारी सांभाळू. जबाबदरीला घाबरेल तो ठाकरे कसला', असे विधानही त्यांनी केले.
मी व्यंगचित्र
काढायचो पण...
वेड्यावाकड्या रेघोट्या मारल्या म्हणजे
व्यंगचित्र होतं असं काही लोकांना वाटतं पण ते वाटतं तितकं ते सोपं नाही. व्यंग
म्हणजे त्या कॅरॅक्टरच्या विचारातील आणि वागण्यातील व्यंग हेरून ते तुम्हाला
उतरवायचं असतं. ते चित्रात दाखवणे ही खूप मोठी कला आहे. मीसुद्धा काही काळ
व्यंगचित्र काढलेली आहेत आणि आता असं झालंय की कॅमेरा पाहायलाही वेळ मिळत नाही, असे नमूद करत काहीशी खंत कलासक्त
मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली
0 टिप्पण्या