Ticker

6/Breaking/ticker-posts

बिबट्या तर कोंडला शेळ्यांच्या गोठ्यात, मात्र त्याने केल अस काही..

 *संगमनेर तालुक्यातील गावात बिबट्याचा धुमाकूळ

*शेतकऱ्यानं बिबट्याला कोंडलं शेळ्यांच्या गोठ्यात

*बिबट्या जेरबंद, पण शेतकऱ्यानं गमावल्या ८ शेळ्या



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

संगमनेर: एखाद्या भागात बिबट्या दिसल्यावर त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला जातो. मात्र, अनेकदा बिबट्या सहजासहजी सापडत नाही. वस्तीवर, गोठ्यात आलेल्या बिबट्याला हुसकावून लावत नुकसान टाळण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. मात्रसंगमनेर तालुक्यातील एका शेतकऱ्याने बिबट्या पकडला जावा म्हणून त्याला शेळ्या असलेल्या गोठ्यातच कोंडले. वनविभागाने त्याला पकडले खरे, मात्र तोपर्यंत त्याने गोठ्यातील आठ शेळ्या ठार केल्या.

संगमनेर तालुक्यातील पठारभागातील वनकुटे येथे ही घटना घडली. शेतकरी प्रकाश रेवजी हांडे वनकुटे गावाजवळ असलेल्या कळमजाई वस्ती येथे राहतात. हांडे यांचा शेळीपालनाचा व्यवसाय आहे. शुक्रवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी आपल्या शेळ्या एका खोलीत कोंडल्या होत्या. मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांच्या वस्तीवर बिबट्या आला. शेळ्या बांधून ठेवलेल्या खोलीत तो गेला. तेथे शेळ्यांवर हल्ला केल्यामुळे त्या ओरडू लागल्या. आवाज ऐकून हांडे झोपेतून जागे झाले. काय झाले पाहण्यासाठी ते घराच्या बाहेर आले. शेळ्या बांधलेल्या खोलीच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी खोलीत जाऊन पाहिले असता, समोर बिबट्या दिसला. खोलीतील काही शेळ्या त्याने ठार केल्या होत्या. हांडे समोर आल्याचे पाहून बिबट्याने त्यांच्या दिशेने धाव घेतली. मात्र हांडे यांनी पटकन खोलीच्या बाहेर येत खोलीचा दरवाजा बंद केला. त्यामुळे बिबट्या शेळ्या असलेल्या खोलीतच अडकला गेला.

त्यानंतर हांडे यांनी ही माहिती सीताराम हांडे यांना व वनविभागाच्या अधिकार्‍यांना दिली. माहिती समजताच वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी रामदास थेटे, वनरक्षक सुजाता टेंबरे, दिलीप बहिरट, बाळासाहेब वैराळ वस्तीवर पिंजरा घेवून आले. तोपर्यंत आणखी काही ग्रामस्थ तेथे जमले होते. त्यांनी खोलीच्या बाहेर पिंजरा लावला. सुमारे तीन तासांनंतर बिबट्या तेथून जायला निघाला आणि पिंजऱ्यात अडकला.

 बिबट्या पकडला गेल्याने ग्रामस्थांसह वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, पकडण्यापूर्वी बिबट्याने आठ शेळ्या ठार केल्या होत्या. त्यातील काही फस्तही केल्या होत्या. वस्ती आणि परिसरातील ग्रामस्थांचा त्रास वाचावा म्हणून आपल्या शेळ्यांचा बळी देऊन बिबट्या पकडून देणाऱ्या हांडे यांचे कौतुक होत आहे. वन विभागाकडून त्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या