Ticker

6/Breaking/ticker-posts

१४ ऑगस्ट हा दिवस 'फाळणी त्रासिका स्मरण दिन', पंतप्रधानांची घोषणा

 *यंदा १५ ऑगस्ट रोजी भारताच्या स्वातंत्र्याला ७४ वर्ष पूर्ण होणार

*१४ ऑगस्ट हा दिवस फाळणीच्या आठवणी जाग्या करण्याचा दिवस

*१४ ऑगस्ट पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून १४ ऑगस्ट  हा दिवस 'फाळणी त्रासिका स्मरण दिन'म्हणून पाळण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. ही गोष्ट पंतप्रधान मोदींनी स्वत: आपल्या सोशल मीडिया 'ट्विटर' खात्यावरून जाहीर केलीय.

१४ ऑगस्ट हा दिवस 'फाळणी त्रासिका स्मरण दिन' म्हणून पाळण्यामागचं कारणंही त्यांनी यावेळी सांगितलंय. मोदींच्या म्हणण्यानुसार, १४ ऑगस्ट या दिवशी घृणा आणि हिंसाचारामुळे आपल्या लाखो भावा-बहिणींना विस्थापित व्हावं लागलं. त्यांच्या बलिदानाच्या स्मरणाच्या निमित्तानं हा दिवस 'फाळणी त्रासिका स्मरण दिन' म्हणून आठवणीत ठेवला जाईल.

देशाच्या फाळणीचं दु:ख कधीही विस्मरणात टाकलं जाऊ शकत नाही. केवळ घृणा आणि हिंसाचारामुळे आपल्या लाखो भावा-बहिणींना विस्थापित व्हावं लागलं आणि आपला जीवही गमवावा लागला. त्याच लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणासाठी १४ ऑगस्ट हा हा दिवस 'फाळणी त्रासिका स्मरण दिन' म्हणून पाळला जावा, असं म्हणताना पंतप्रधान मोदींकडून सोशल मीडियावर #PartitionHorrorsRemembranceDay हा हॅशटॅगही वापरण्यात आला आहे.

हा दिवस आपल्याला भेदभाव, शत्रुत्व आणि दुर्भावनेच्या विषाला संपुष्टात आणण्यासाठी केवळ प्रेरित करणार नाही तर यामुळे एकता, सामाजिक सद्भाव आणि मानवीय संवेदना आणखीन मजबूत होतील, असंही मोदींनी म्हटलंय.

१९४७ मध्ये फाळणीचा काळ भारताच्या इतिहासातील अतिशय त्रासदायक काळ ठरलाय. १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले. देशाच्या फाळणीनं लाखो हिंदू आणि मुस्लिम कुटुंबांना विस्थापित व्हावं लागलं. सोबतच
, ठिकठिकाणी धार्मिक दंगलीही उसळल्या. या काळाचा अनुभव घेणाऱ्या अनेक नागरिकांच्या मनात हत्या, बलात्कार, लूट आणि इतर भयानक आठवणी दीर्घकाळापर्यंत कायम राहिल्या. पंतप्रधान मोदींकडून ही घोषणा पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी आणि भारताच्या स्वातंत्र्याची ७४ वर्षे पूर्ण होण्याच्या एक दिवस आधी करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या