Ticker

6/Breaking/ticker-posts

कामकाजाची दोरी केवळ महिला सरपंचांच्या हाती; उचा’पती’ना चाप,हस्तक्षेप केल्यास कारवाई

 









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

पालघरः ग्रामपंचायतींमध्ये सरपंच म्हणून निवडून आलेल्या अनेक महिलांच्या पतींचा किंवा अन्य नातेवाइकांचा कामकाजात वाढता हस्तक्षेप पाहता सरकारने कायद्याचा बडगा उगारला. तरीही पडद्याआडून पुरुषच सूत्रे हलवत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत विविध माध्यमांतून आवाजही उठवण्यात आला. अनेकांनी तक्रारी केल्या. त्यानंतर आता ही स्थिती बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सरपंच महिलेच्या कारभारात ढवळाढवळ करणाऱ्यांवर थेट कारवाईचा इशारा सरकारी यंत्रणांनी दिला आहे.

महिला सरपंच असली, तर पती आणि नातेवाईक तिच्या कामात हस्तक्षेप करीत असल्याचे जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनुभवयास मिळत आहे. परंतु आता पती किंवा अन्य नातेवाईक ग्रामपंचायतीच्या कामात हस्तक्षेप करताना आढळून आल्यास थेट कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र महिला सरपंच असलेल्या बहुतांश गावांमध्ये त्यांचे पतीच ग्रामपंचायतींचा कारभार चालवताना दिसतात. विरोधकांकडून यावर आवाजही उठवण्यात आला आहे. मात्र आता असा हस्तक्षेप आढळल्यास थेट कारवाईचा इशारा सरकारने दिला. पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. येथे महिला सरपंच मोठ्या संख्येने आहेत. परंतु अनेकदा पुरुष उपसरपंच अथवा ग्रामविकास अधिकारी कामकाज करत असल्याचे निदर्शनास येते. उपसरपंचाशी, ग्रामविकास अधिकाऱ्यांशी जमत नसल्यास पती अथवा नातेवाईक, पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने कारभार हाकला जात असल्याचे दिसून येत आहे.

पालघर जिल्ह्यात एकूण ४७३ ग्रामपंचायती असून जुलै २०२१अखेर ३०६ ग्रामपंचायतींच्या मुदती संपुष्टात आल्या. तेथे सध्या प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. उर्वरित १६७ ग्रामपंचायतींपैकी ७० ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच कारभार चालवत आहेत. ही सूत्र केवळ त्यांनीच सांभाळावीत, यासाठी अन्य कोणत्याही व्यक्तीचा हस्तक्षेप आढळल्यास कारवाईचा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाने दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या