Ticker

6/Breaking/ticker-posts

आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे निधन

 
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

पुणेः योगगुरू व आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन. मागील आठवड्यात त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८१ वर्षांचे होते.

हजारो वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या आयुर्वेदाच्या प्रचार, प्रसार आणि संशोधनात गेल्या साडेतीन दशकांपासून अधिक काळ डॉ. बालाजी तांबे कार्यरत होते. बालाजी तांबे यांनी आयुर्वेदातील आणि अभियांत्रिकीमधील पदवी एकाच वर्षी मिळली होती. तसंच, त्यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यावरही संशोधन केलं होतं.

बालाजी तांबे यांनी त्यांच्या पुस्तकांच्या माध्यमातूनही आयुर्वेदाचा प्रसार केला. सोप्या भाषेत त्यांनी अनेक पुस्तके लिहली आहे. तांबे यांनी 'गर्भसंस्कार' या पुस्तकाचे लेखन केले. त्यांच्या या पुस्तकाला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या पुस्तकाच्या लाखोप्रती वाचकांनी घेतल्या. इंग्रजीसह सहा भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झाले आहे.

बालाजी तांबे यांच्या पार्थिवावर मंगळवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनील, संजय आणि स्नूषा व नातवंडे असा परिवार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. डॉ. तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहे. आयुर्वेदाबाबतचा डोळस दृष्टीकोन निर्माण करण्यात आणि नव्या पिढीत त्याबाबतची गोडी निर्माण करण्यात डॉ. तांबे यांचे मोलाचे योगदान राहीले आहे. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

राज्यपालांनी व्यक्त केला शोक

आयुर्वेद व योग प्रचार प्रसारासाठी आयुष्य वेचणारे आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. डॉ. तांबे यांनी लिखाण तसेच व्याख्यानांच्या माध्यमातून निरामय जीवन जगण्यासाठी लोकांना अखेरपर्यंत मार्गदर्शन केले. योगाप्रमाणेच आयुर्वेदाचे व श्रीमत भगवद्गीतेचे ज्ञान संपूर्ण जगापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. ईश्वर त्यांना आपल्या श्रीचरणांजवळ स्थान देवो व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो ही प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी म्हटलं आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या