Ticker

6/Breaking/ticker-posts

शरद पवार यांची सह्याद्रीवर महत्त्वाची बैठक; मंत्री, नेत्यांना कानपिचक्या ?

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई: भाजपच्या जन आशीर्वाद यात्रे दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर करण्यात आलेली अटकेची कारवाई आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे लागलेला ईडी चौकशीचा फेरा यामुळे राज्यात राजकारण तापलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत महत्त्वाची बैठक घेतली. तब्बल तीन तास ही बैठक चालली. या बैठकीबाबत नंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माहिती दिली.

सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक झाली. शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे अन्य मंत्री आणि नेते उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकारमधील पक्षाचे मंत्री, पालकमंत्री व संपर्कमंत्री यांच्या कामाबाबतचा या बैठकीत आढावा घेण्यात आला तसेच पक्षसंघटना बळकट करण्यासाठीच्या ध्येयधोरणांवर साधकबाधक चर्चा करण्यात आली, असे ट्वीट राष्ट्रवादीकडून करण्यात आले आहे.

बैठकीबाबत नवाब मलिक यांनी अधिक तपशील दिला. बैठकीत सर्व मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेताना संपर्क मंत्र्यांवरील जबाबदारी वाढवण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या फेब्रुवारी महिन्यात अपेक्षित आहेत. त्यामुळे प्रत्येक नेत्याला एक जिल्हा याप्रमाणे जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे, असे मलिक यांनी सांगितले. महामंडळांवरील नियुक्त्यांचा निर्णय लवकरात लवकर घेण्याचा आग्रह धरला गेला आहे. पुढच्या १५ दिवसांत ही नावे जाहीर केली जातील, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.

भाजपवर टीका

राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे ईडी चौकशी लावण्यात आल्यावरून मलिक यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. बैठकीत ईडीबाबत चर्चा झाली नसली तरी यामागे भाजपची कटकारस्थाने आहेत आणि सगळं काही ठरवून केलं जात आहे. त्यामुळे आम्हीही हा लढा कायदेशीर आघाडीवर लढणार आहोत, असे मलिक यांनी सांगितले. राज्यात येत्या काळात मोठे सण असल्याने गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकारने निर्बंध लावण्याची सूचना केली आहे. त्याकडे बोट दाखवत भाजपवर मलिक यांनी निशाणा साधला. एकीकडे केंद्राने गर्दी रोखायला सांगितले आहे आणि दुसरीकडे भाजप गर्दी करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करत आहे, हा भाजपचा दुतोंडीपणा आहे, अशी टीका मलिक यांनी केली. आज हट्टाने काही ठिकाणी दहीहंडी बांधली गेली आणि त्यांनाच ती फोडावी लागली. यात लोकांचा सहभाग नव्हता, असा टोला लगावताना राजकीय लाभासाठी जनतेचा बळी देऊ नका, अशा शब्दांत मलिक यांनी मनसे आणि भाजपला फटकारले.

राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका:

* स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीसह सर्व निर्णय स्थानिक पातळीवर घेतले जातील.

*ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोवर निवडणुका घेण्यात येऊ नयेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या