Ticker

6/Breaking/ticker-posts

पंतप्रधान मोदींच्या फ्लेक्समुळे महापालिकेसमोर मोठा पेच, कारवाई वर प्रश्नचिन्ह ?…

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अहमदनगर: मोफत लसीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करणे, लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचे छायाचित्र असणे यासंबंधी वेगवेगळे मतप्रवाह आणि वादप्रतिवाद सुरू आहेत. अशातच अहमदनगरमध्ये भाजप खासदाराने लावलेल्या फ्लेक्सवरून महापालिकेपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. लसीकरण केंद्राबाहेर लावण्यात आलेल्या धन्यवाद मोदीजीफलकांबद्दल तक्रार आल्याने मनपाने कारवाई सुरू केली खरी, मात्र वरिष्ठ पातळीवरून हस्तक्षेप झाल्यावर ती थांबविण्यात आली. नियमानुसार फ्लेक्सला परवानगी कशी देता येईल, याचाही पेच निर्माण झाला आहे.

नगर शहरात महापालिका रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालय येथे करोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र लस उपलब्ध झाल्यापासूनच सुरू आहेत. मात्र, दोन दिवसांपूर्वी तेथे भाजपचे खासदार सुजय विखे यांच्याकडून आभार व्यक्त करणारे फ्लेक्स लावण्यात आले. सर्वांना मोफत लस दिल्याबद्दल मोदींचे आभार मानणारा मजकूर त्यावर आहे. सोबत पंतप्रधान मोदींचा मोठा फोटो, त्या खालोखाल खासदार विखे यांचा फोटा आणि वरच्या बाजूला लहान आकारात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि दिवंगत ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांची छायाचित्रे आहेत. सर्व नागरिकांना मोफत लस उपलब्ध करून दिल्याबद्दल मोदींचे आभार असा एकूण या फ्लेक्सचा सूर आहे.
शहरातील लसीकरण केंद्राबाहेर हे फ्लेक्स पाहून काही नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारी केल्या. त्यामुळे अतिक्रमण विरोधी पथकाने ते काढून टाकण्यास सुरुवात केली. तीन-चार ठिकाणचे फ्लेक्स काढले असतानाच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेत संपर्क करून या कारवाईला हरकत घेतली. याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांना वरिष्ठ पातळीवरूनही संपर्क झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे कारवाई मोहीम थांबविण्यात आली. यासंबंधी आयुक्त शंकर गोरे यांनी सांगितले की, ‘या फलकांना मनपाची परवानगी नसल्याने ते काढण्याचे काम सुरू केले. त्यांना परवानगी घेण्यास सांगण्यात आले आहे.

वास्तविक शहरात फ्लेक्ससंबंधीचे नियम न्यायालयाच्या आदेशानंतर कठोर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे कोठेही ते लावण्यास परवानगी देणे कठीण आहे. यासाठी मनपाने व्यावसायिक वापरासाठी जे होर्डिंग्ज दिले आहेत, तेथेच अशी सशुल्क परवानगी आहे. मात्र, भाजपला हे फ्लेक्स लसीकरण केंद्रबाहेरच हवे आहेत. त्यामुळे तेथे परवानगी कशी द्यायची, असा प्रश्न तर आहेच. शिवाय उरलेले फ्लेक्स कसे काढायचे, हाही पेच महापालिकेपुढे निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे लशीचा पुरवठा नियमित होत नसल्याने वारंवार लसीकरण ठप्प होत असल्याने लसीकरण केंद्रांवर गोंधळ होण्याचे प्रकार सुरूच आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या