Ticker

6/Breaking/ticker-posts

स्वत: स्थापन केलेल्या बँकेविरुद्ध अण्णा हजारें मैदानात; गैरव्यवहार चौकशीच्याअहवालाची प्रतीक्षा

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 पारनेर:  सरकार आणि विविध संस्थांमधील भ्रष्टाचाराविरूद्ध विविध पातळ्यांवर लढा देणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर स्वत:च स्थापन केलेल्या संस्थेविरूद्ध तक्रार करण्याची वेळ आली. मात्र त्यालाही अण्णा न डगमता मैदानाते उतरले. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर सैनिक सहकारी बँकेतील गैरव्यवहारांबद्दल हजारे यांनी तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन सहकार विभागाने चौकशी केली असून आता अहवालाची प्रतीक्षा आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर सैनिक सहकारी बँकेची स्थापना हजारे यांच्या पुढाकारातून झाली. १९९६ मध्ये बँकेला परवाना मिळाला. बँकेचे संस्थापक अध्यक्ष हजारे होते. त्यांच्या नावामुळे काही काळातच बँकेत मोठ्या प्रमाणावर ठेवी जमा झाल्या. पाच वर्षांनंतर हजारे यांनी बँकेच पद सोडले आणि इतर माजी सैनिकांकडे बँकेची जबाबदारी सोपविली.

त्यानंतर काही काळातच या बँकेबद्दल तक्रारी सुरू झाल्या. बँकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे गेली पाच वर्षे विनायक गोस्वामी, बाळासाहेब नरसाळे, कॅप्टन विठ्ठल वराळ, मारुती पोटघन, संपत शिरसाठ व विद्यमान संचालक सुदाम कोथिंबीरे यांनी सहकार विभागाकडे देऊन तपासणी व्हावी, अशी मागणीही केली होती. मात्र सहकार विभाग ठोस निर्णय घेत नव्हता.

 शेवटी या तक्रारदारानीं त्या फाईल्स हजारे यांच्याकडे दिल्या. हजारे यांनी त्याचा अभ्यास करून खात्री केली. खात्री झाल्यावर सहकार आयुक्तांना पत्र पाठवून सैनिक बँकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली. त्याची दखल घेत या तक्रार अर्जाची स्वतंत्र चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी विभागीय सहनिबंधक आर.सी. शाह यांना दिले. शाह यांच्यासह जवळपास दहा अधिकारी व कर्मचार्‍यांचे पथक गेल्या काही दिवसांपासून सैनिक बँकेत चौकशी करत आहे. लवकरच ते सहकार आयुक्तांना आपला अहवाल सादर करणार आहेत.

हजारे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, आपणही निवृत्त सैनिक आहोत. पारनेर तालुक्यातील इतर सैनिकांनी आग्रह केल्यानंतर सातारा जिल्हयातील सैनिक बँकेप्रमाणेच पारनेर तालुक्यातही सैनिक बँकेची स्थापना करावी असा विचार पुढे आला. त्यासाठी सहकार विभाग आणि भारतीय रिझर्व बँकेकडे पाठपुरावा केल्यानंतर १९९६ मध्ये या बँकेला परवाना मिळाला. या बँकेचा संस्थापक अध्यक्ष आपण असल्यामुळे बँकेला ठेवी जमा झाल्या. परंतु मला कोणतीही निवडणूक लढवायची नसल्याने पाच वर्षांनंतर अध्यक्षपदावरून दूर झालो. बँकेच्या अध्यक्ष, संचालकपदाची धुरा इतर माजी सैनिकांकडे सोपवली. बँकेला उज्वल भविष्य लाभावे, ही आपली संकल्पना होती मात्र, अलीकडच्या काळात या बँकेत भ्रष्टाचाराचा शिरकाव झाल्याचे पुरावे आपणाकडे आल्याने दुःख झाले आहे. ते आपल्याकडे देत असून त्याची योग्य चौकशी व्हावी, अशी मागणी हजारे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या