Ticker

6/Breaking/ticker-posts

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विखेंची आघाडी; पक्षाच्या आधी केली मदत जाहीर..

 * विखेंची मतदारसंघात मदत संकलित करण्यासही सुरवात

 





लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर: कोकणातील अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी आपले एक महिन्याचे वेतन देत असल्याची घोषणा भाजपचे शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील   यांनी केली. भाजपकडून पक्षपातळीवर असा निर्णय होण्यापूर्वीच विखे यांनी ही घोषणा केली असून मतदारसंघात मदत संकलित करण्यासही सुरवात केली आहे.

 

यासंबंधी बोलताना विखे पाटील म्हणाले, ‘कोकणातील आपतीग्रस्त नागरिकांना मदतीसाठी राज्यसरकारचा हात आखडताच आहे. कोकणावर आलेलं संकट हे आपल्‍याच कुटुंबावर आलेलं आहे. नुसता शाब्दिक दिलासा देऊन काही होणार नाही. कोकणवासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाण्याची वेळ आहे. शिर्डी मतदार संघातून कार्यकर्त्‍यांनी गापातळीवर मदतीसाठी पुढाकार घ्‍यावा. या मदतीची सुरूवात आपल्यापासून करीत असून, आपले एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देत आहोत.'


विखे पुढे म्हणाले की, 'राज्य सरकारने तात्काळ मदत जाहीर करणे अपेक्षित होते. पण तसे होताना दिसत नाही. शिर्डी विधानसभा मतदारसंघातून मदत पाठविण्याचे नियोजन गावपातळीवर करण्यात येत आहे. ही एकत्रित मदत कोकणात संकटग्रस्‍त कुटुंबियांपर्यंत पोहचविण्‍यात येईल. माणुसकीचा धर्म म्‍हणून मतदार संघातील सर्व कार्यकर्त्‍यांनी आपल्‍या गावातून शक्‍य ती मदत गोळा करुन, कोकणातील आपत्‍तीग्रस्‍तांना पाठविण्‍यासाठी पुढाकार घ्यावा. यापूर्वी राज्यात अनेक नैसर्गिक संकट आली. पण राज्य सरकारची कोणतीच मदत आपतीग्रस्त किंवा शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना कोणताच लाभ झालेला नाही. पीक विमा कंपन्‍यांकडून शेतक-यांची फसवणूक झाली आहे. नैसर्गिक आपत्‍तीत सरकारने नागरिकांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्‍याची गरज आहे,’ असेही विखे पाटील म्हणाले.

 

पक्षाच्या आमदारांनी आपले वेतन मदत म्हणून देण्याचा निर्णय शक्यतो पक्षाच्या पातळीवर होत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसने तसा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार आपले एक महिन्याचे वेतन देणार आहेत. विखे यांनी मात्र वैयक्तिक पातळीवर अशी घोषणा केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या