Ticker

6/Breaking/ticker-posts

राज ठाकरे पुन्हा मैदानात; 'हा' गड काबीज करण्यासाठी आखणार रणनीती

 *१६ जुलैपासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर.

*महापालिका जिंकण्यासाठी देणार कानमंत्र.
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई:  मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत. येत्या १६ जुलैपासून राज ठाकरे हे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर जात असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.

कोविड काळात राज ठाकरे हे मोठ्या घडामोडींवर पत्रकार परिषद वा निवेदनाच्या माध्यमातून व्यक्त होत असले तरी संघटनात्मक कार्यक्रमांमध्ये मात्र खंड पडला आहे. ते पाहता राज ठाकरे यांचा नाशिक दौरा लक्षवेधी ठरणार आहे. १६, १७ आणि १८ जुलै असे तीन दिवस राज ठाकरे नाशिक मुक्कामी असणार आहेत. या दौऱ्यात ते काही महत्त्वाच्या बैठका घेणार आहेत व संघटनात्मक पातळीवर आढावाही घेणार आहेत. नाशिकमधील सध्याची राजकीय स्थिती, पक्ष संघटनेची नव्याने बांधणी आगामी नाशिक महापालिका   निवडणुकीसाठी व्यूहरचना यावर या दौऱ्यात राज यांचा फोकस असेल असे सांगण्यात येत आहे. राज यांचा हा दौरा मनसेसाठी उत्साह वाढवणारा ठरणार असून अन्य पक्षांची अस्वस्थताही या दौऱ्याने वाढणार हे स्पष्टच आहे.

नाशिक दौरा महत्त्वाचा का?

नाशिक आणि राज ठाकरे यांचं पहिल्यापासूनच घट्ट नातं राहिलेलं आहे. मनसेच्या स्थापनेपासून नाशिक हा मनसेचा गड राहिला आहे. महापालिकेत एकहाती सत्ता आणि तीन आमदार नाशिकने मनसेला दिलेले आहेत. पक्षांतर्गत गटबाजी आणि काही नेत्यांनी दिलेला दगाफटका यामुळे नाशिकवरील वर्चस्व आज मनसेने गमावलं असलं तरी आगामी महापालिका निवडणुकीत या साऱ्याची परतफेड करून पुन्हा नाशिकचा गड भक्कम करण्याचा राज यांचा इरादा आहे. त्यासाठी पक्षाची नाशकात नव्याने बांधणी करण्यासाठी येत्या काळात काही कठोर निर्णयही राज घेतील अशी शक्यता असून या पार्श्वभूमीवर त्यांच्या नाशिक दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या