Ticker

6/Breaking/ticker-posts

'त्या' २१ मृत सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना न्याय मिळणार; मुंडे यांचे निर्देश

 

*सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्नांवर धनंजय मुंडे यांची बैठक.

*स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे मुंडे यांचे निर्देश.



लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 मुंबई : सामाजिक न्याय विभागाने सफाई कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत, हाताने मैला उचलणाऱ्या मृत सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याबाबत केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार ३२ मृत सफाई कर्मचाऱ्यांपैकी फक्त ११ जणांनाच लाभ मिळाला आहे. त्यामुळे उर्वरीत २१ प्रकरणे ज्या ज्या पातळीवर प्रलंबित आहेत त्यावरती विभागांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रीधनंजय मुंडे यांनी बैठकीत दिले.




हाताने मैला उचलणाऱ्या मृत सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव  श्याम तागडे समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव दिनेश डिंगळे, नगरविकास, कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सन २०२०च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषद सदस्य  भाई गिरकर यांनी या विषयासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यामध्ये हाताने मैला उचलणाऱ्या मृत सफाई कर्मचाऱ्यांच्या हितांसंदर्भात केंद्र शासनाने केलेल्या कायद्याप्रमाणे राज्यात कार्यवाही करावी असे त्यांनी सूचित केले होते.

केंद्र शासनाने हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे यासाठी ६ डिसेंबर २०१३ पासून देशात कायदा लागू आहे. या कायद्यातंर्गत दूषित गटारांमध्ये काम करताना मृत्यू पावलेल्या हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याबाबत केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार ३२ पैकी फक्त ११ जणांना याचा लाभ मिळाला आहे तर उर्वरित २१ प्रकरणे ज्या ज्या पातळीवर प्रलंबित आहेत त्यावरती विभागांनी तात्काळ कार्यवाही करावी, अशी सूचना मुंडे यांनी केली.

सफाई कामगारांच्या घरांचा २१ वर्षाचा अनुशेष भरून काढणे, सफाई कामगारांचे वारसा हक्क कायदे, सफाई कामांमधील ठेकेदारी पद्धती रद्द करणे, याबाबत नगरविकास विभागाने आतापर्यंत काय कार्यवाही केली आहे, याची माहिती आठ दिवसांत सामाजिक न्याय विभागाला सादर करावी. घनकचऱ्याशी संबधित सर्व कामगारांना सफाई कामगार हे पदनाम देवून लाड पागे समितीच्या शिफारशींची अमंलबजावणी करावी असे निर्देशही मंत्री मुंडे यांनी यावेळी दिले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या