Ticker

6/Breaking/ticker-posts

प्रदूषणमुक्त प्रवास! समृद्धी महामार्गालगत लावणार ११ लाख झाडे

 *हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाभोवती ११ लक्ष ३१ हजार झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

*महामार्गाच्या दोन्ही बाजूंस वृक्षारोपण करण्यात येणार असून दोन्ही मार्गांच्या मध्यावर असलेल्या दुभाजकावरही सुशोभित रोपे लावण्यात येणार आहेत.

*या नियोजनामुळे या महामार्गावर प्रदूषण रहित प्रवास करणे शक्य होणार आहे.

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबई: महाराष्ट्र राज्यात सुरु असलेल्या सर्वात मोठ्या व महत्वपूर्ण प्रकल्पांपैकी एक असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाभोवती ११ लक्ष ३१ हजार झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंस वृक्षारोपण करण्यात येणार असून दोन्ही मार्गांच्या मध्यावर असलेल्या दुभाजकावरही सुशोभित रोपे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रदूषण रहित प्रवास करणे शक्य होणार आहे. या महामार्गाभोवती मोठ्या प्रमाणात करण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीमुळे ग्लोबल वार्मिंग आणि हवामान बदल रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांमध्येही मोठा हातभार लागणार आहे.


महामार्गाच्या कॉरिडॉरमध्ये मनुष्य व वन्य प्राण्यांचे होणारे अपघात टाळण्यासाठी व त्यांचा प्रवेश प्रतिबंधित करण्यासाठी महामार्गालगत करण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीमध्ये त्यांना आकर्षित करणाऱ्या आंबा, काजू, जांभूळ, संत्रा, मोसंबी व खजूर अशा १३ प्रकारच्या फळझाडांच्या लागवडीस विशेष करून वगळण्यात आले आहे.

प्रकल्पामध्ये वन्यजिव संरक्षणासाठी एकूण ९६ बांधकामे प्रस्तावित केली असून, त्यांची रचना वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे. यामध्ये वन्यप्राण्यांना रस्ता ओलांडण्यासाठी ७ ओव्हरपास ब्रिज तसेच अंडरपास, बॉक्स कलवर्ट व लहान-मोठ्या अशा ८९ पूलांचा समावेश आहे. या मधून जाताना प्राण्यांना आपण जंगलातच आहोत अशी अनुभूती मिळावी म्हणून त्यानुसार या संरचनांची बांधणी करण्यात येणार आहे. वन्यवजीवांच्या वावरासाठी महत्वपूर्ण असलेल्या ठिकाणी ध्वनी नियंत्रणाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, आवश्यक त्या ठिकाणी संरक्षण भिंतीची उंची वाढवण्यात आली आहे. वन्यजिव संरक्षणाच्या कामांसाठी एकूण अंदाजे ३२६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

वृक्षारोपण झाल्यानंतर या झाडांची व रोपांची ५ वर्षांकरीता नियमित काळजी व निगा राखण्यासाठी देखील नियोजन करण्यात आले आहे. या झाडांना सिंचनाच्या पद्धतीचा अवलंब करून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. पावसाळ्यातील पाण्याची साठवण करून सर्व झाडांना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिले जाणार आहे.

महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम अत्यंत वेगाने सुरु आहे. तसेच नागपूर शिर्डी दरम्यानचा ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात हा टप्पा सुरू करण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती नगरविकास तसेच सार्वजनिक बांधकाम (सा. उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या