Ticker

6/Breaking/ticker-posts

नगर- कर्जत- करमाळा राष्ट्रीय मार्ग हा कर्जतच्या विकासाचा महामार्ग -खा. सुजय विखे पा.

 



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 कर्जत: पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यामुळे नगर- कर्जत- करमाळा हा राष्ट्रीय महामार्ग होत असून तो कर्जत तालुक्याच्या विकासाचा  महामार्ग ठरणार आहे, त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागला मात्र त्यात यश आले याचे समाधान आहे. तथापि या रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य ती कागदपत्रे दाखल करावेत, त्याना योग्य तो मोबद्ला मिळवून दिला जाईल अशी ग्वाही खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

 नगर -करमाळा या राष्ट्रीय महामार्गाच्या भूमिअधिग्रहण संदर्भात कर्जत येथे पंचायत समिती सभागृहांत आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते. पुढे बोलताना खा. विखे पा.म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यामुळे नगर- कर्जत -करमाळा हा राष्ट्रीय महामार्ग होत आहे .यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला होता आणि त्याला यशही आले. त्याची निविदा देखील निघाली असून शेतजमिनीचे अधिग्रहण होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने जिल्हाधिकारी व शासनाने अध्यादेश काढले आहेत, तरी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा मोबदला योग्य ती कागदपत्रे सादर करून घ्यावा.

  यावेळी  विखेे म्हणाले की राज्य सरकार किंवा कोणाचाही या रस्त्यामध्ये मंजुरीसाठी संबध नाही, त्यामुळे इतर कोणीही याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न देखील करू नये, शेतकऱ्यांनी तातडीने त्यांच्या शेतजमिनीचे पैसे घ्यावेत अन्यथा सर्व पैसे जिल्हाधिकारी न्यायालयामध्ये वर्ग करतील . यामुळे शेतकरी बांधवांची अडचण वाढू शकते याबाबत गुरुवार पर्यंत सर्व शेतकऱ्यांना नोटीस बजावन्याबाबत  प्रांताधिकारी यांना सूचना दिल्या. हा रस्ता कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करणारच हा रस्ता पूर्ण झाल्याने खऱ्या अर्थाने कर्जत व इतर तालुक्यांना देखील याचा मोठा फायदा होईल असे त्यांनी सांगितले. या दौर्यात खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले

खा. विखे यांची स्वतंत्र यंत्रणा

शेतकऱ्यांना जमिनीचे पैसे मिळावे यासाठी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची स्वतःची यंत्रणा आता या परिसरामध्ये काम करणार आहे.  गावोगावी त्यांचे प्रतिनिधी पाठवून शेतकऱ्यांची कागदपत्र जमा करून शेतकऱ्यांना घेऊन कर्जत येथील प्रांताधिकारी कार्यालय मध्ये ज्यांच्या अडचणी आहेत त्या देखील सोडवण्यासाठी खासदार विखे पुढाकार घेणार आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी आपण पुढाकार घेतला असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले .

प्रांताधिकारी अर्चना नष्टेच्या बद्लीची मागणी

 या बैठकीमध्ये उपस्थित शेतकऱ्यांनी खा.  विखे पाटील यांच्या समोर प्रांत अधिकारी अर्चना नष्टे यांच्यावर गंभीर आरोप  केले. या आरोपाने विखे पाटील देखील अवाक झाले.अनेकांनी जाहीरपणे त्यांच्या बदलीची देखील मागणी केली.

 यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ,प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, एड.बाळासाहेब शिंदे दादासाहेब सोनमाळी, सचिन पोटरे, प्रकाश शिंदे काकासाहेब धांडे ,पप्पू शेठ दोधाड ,रामदास हजारे सुनील यादव, राहुल गांगुर्डे ,संजय तापकीर, प्रांताधिकारी अर्चना     नष्टे ,राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी  दिवाण ,तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्यासह कार्यकर्ते,नागरिक उपस्थित होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या