लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नाशिक : आजपर्यंत तुम्ही अनेक प्रेमप्रकरणं ऐकली असतील, विविध प्रकारचे विवाहही बघितले असतील मात्र नाशिकमधील एक बहुचर्चित विवाहसोहळा अखेर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पद्धतीने पार पडला असून समाजासाठी हा नक्कीच एक आदर्श असा सोहळा ठरलाय. हा विवाह सोहळा आज ( गुरुवार 22 जुलै) हॉटेल एस एस के येथे अगदी मोजक्या लोकांमध्ये हा पार पडला आहे. या विवाह सोहळ्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्र सेवा दल व छात्रभारती यांचे कार्यकर्ते पाठिंब्यासाठी हजर होते. या विवाहाला समाजातील काही लोकांनी विरोध केल्याने रद्द करावा लागला होता.
नाशिकच्या एका हॉटेलमध्ये मंगळवारी पार पडलेला हा विवाह सोहळा एक खास असा ठरलाय. कारण हा विवाह होता तो रसिका आडगावकर आणि आसिफ खान यांचा. या सोहळ्याला विशेष असे महत्व का होते हे खरं तर तुम्हाला वर आणि वधूची नावे ऐकूनच समजले असेल. रसिका आणि आसिफचे काही वर्षांपूर्वी प्रेमसंबंध जुळले, रसिका दिव्यांग असतानाही कुठल्याही अटीशिवाय आसिफने तिला स्विकारले होते. दोघांनी 21 मे 2021 रोजी कोर्ट मॅरेज तर केले. मात्र, मुलीचे वडील प्रसाद आडगावकर एक नामांकित सराफ व्यावसायिक असल्याने हा सोहळा नातेवाईकांच्या उपस्थितीत थाटामाटात करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. त्यानुसार दोन्ही धर्माच्या कुटुंबातील सदस्यांची लग्नाबाबत झालेली बैठक यशस्वी होताच कोरोनाची पार्श्वभूमी विचारात घेऊन हा सोहळा मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत 18 जुलै 2021 रोजी करण्याचे ठरले तर होते. मात्र, काही दिवसातच हे लग्न रद्द झाले असे सांगण्याची वेळ प्रसाद आडगावकर यांच्यावर आली.विशेष म्हणजे हिंदू आणि
मुस्लिम या दोन्ही धर्मांच्या रितीरिवाजाप्रमाणे ईथे सर्व विधी पार पाडले गेले.
दुपारी 12 वाजता
वऱ्हाडी मंडळी हॉलमध्ये दाखल होताच कपाळी मुंडावळ्या बांधत आसिफ आणि रसिकाने
लगीनगाठ बांधायला सुरुवात केली आणि त्यांनतर मंगलाष्टकांच्या सुरात आणि शुभमंगल
सावधानच्या मंत्रोच्चरात रसिका आणि आसिफने एकमेकांच्या गळ्यात हार घातला आणि सात
फेऱ्या घेत हिंदू पद्धतीने लग्न केले. दुपारी जेवणाची पंगत पार पडताच
संध्याकाळी पाच वाजता मुस्लिम धर्मगुरू येताच साक्षीदारांच्या उपस्थितीत कबूल हे,
कबूल हे म्हणत आणि मिंया-बिवीचे तोंड गोड करत इस्लामिक पद्धतीने
नवजोडीला वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
एकंदरीतच काय तर समाजाचा, काही कट्टरवादी संघटनांचा विरोध
झुगारुन रसिका आणि आसिफ विवाहबद्ध झाले आणि खऱ्या प्रेमाचा विजय झाला. हा सोहळा
म्हणजे समाजासाठी नक्कीच एक आदर्श असाच ठरलाय.
0 टिप्पण्या