Ticker

6/Breaking/ticker-posts

अमेरिका-जपानचा गुप्त युद्ध सराव ; चीनसोबत युद्धाची तयारी?

 


लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 न्युयार्क: तैवानबाबत चीनकडून घेतली जाणारी आक्रमक भूमिका पाहता अमेरिका आणि मित्र देश सतर्क झाले आहेत. अमेरिका आणि जपान संयुक्तपणे एक गुप्तपणे युद्ध सराव करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. चीनकडून तैवान आणि दक्षिण चीन समुद्राबाबत आक्रमक भूमिका घेतली जात आहे. अशावेळी दोन्ही देशांचा युद्ध सराव सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळाच्या अखेरच्या दिवसात या युद्ध सरावाबाबत अमेरिका आणि जपानच्या अधिकाऱ्यांनी गंभीरपणे चर्चा केली होती.

ब्रिटिश वृत्तपत्र 'फायन्शियल टाइम्स' ला या युद्ध सरावाशी निगडीत असलेल्या सूत्रांनी ही माहिती दिली. हा युद्ध सराव दक्षिण चीन समुद्र आणि पूर्व चीन समुद्रात सुरू आहे. वर्ष २०१९ मध्ये जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांनी चीनची तैवान आणि सेनकाकू बेटांबाबत आक्रमक भूमिका पाहता लष्करी नियोजनाला व्यापक स्वरुप देण्याचा निर्णय घेतला होता.

अमेरिका आणि जपानमध्ये नेतृत्व बदल झाल्यानंतरही चीनविरोधातील लष्करी तयारी सुरू आहे. १५ जून रोजी चीनचे २८ फायटर जेट तैवानच्या हद्दीत शिरले होते. इतकंच नव्हे तर चिनी नौदल, हवाई दल आणि कोस्ट गार्डनेदेखील जपानच्या सेनकाकू बेटांजवळ अधिक सक्रिय झाले होते.

दक्षिण चीन समुद्रात चीनकडून वर्चस्व निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चीनच्या नौदलाने या भागात अनेकदा गस्त घातली आहे. मागील वर्षभरात चीनने आक्रमक विस्तारवादी भूमिका घेतली होती. त्यामुळे अनेकवेळेस दक्षिण चीन समुद्रात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या