Ticker

6/Breaking/ticker-posts

एक दिवस भारताचा पंतप्रधान होईन.. ‘या’ व्यक्त केला निर्धार

 *ओबीसी आरक्षणासाठी राष्ट्रीय समाज पक्ष करणार चक्का जाम आंदोलन

*रासप नेते महादेव जानकर यांनी कोल्हापुरात दिली माहिती

*गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल प्रतिक्रिया देण्यास नकारलोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

कोल्हापूर: 'मी देशातील अनेक राज्यात पसरलेल्या एका पक्षाचा संस्थापक अध्यक्ष आहे. कुणाच्या मागे फिरायला मी काही कुणाचा गुलाम नाही. राष्ट्रीय समाज पक्षाचे अंतिम ध्येय दिल्ली आहे. कुणाचाही आधार घेईन, पण एक दिवस भारताचा पंतप्रधान होईन,' असा निर्धार रासपचे अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर यांनी आज व्यक्त केला.

ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष ४ जुलै रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार आहे. त्या आंदोलनाच्या तयारीच्या निमित्तानं कोल्हापुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. ' देशाची सत्ता ताब्यात घेण्यासाठी, बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी मी रासपची स्थापना केली आहे. अनेक राज्यात या पक्षाचा विस्तार झाला आहे. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीत या पक्षाचे प्रतिनिधी आहेत. पक्षाची वाटचाल योग्य पद्धतीने सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचा रस्ता डांबरीकरणाचा आहे, तर भाजपचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा आहे. आपला रस्ता मात्र फारच वेगळा आहे. रासपचे आज दोन आमदार आहेत. उद्या २५ होतील. काही खासदार होतील. कधी ना कधी रासपची ताकद वाढेल. या देशाचा पंतप्रधान म्हणून मला संधी मिळेल. मी नाही झालो तरी रासपचा माणूस पंतप्रधान होईल. त्यासाठी मला कुणाचाही आधार घ्यावा लागला तरी चालेल,' असंही जानकर म्हणाले.

...म्हणून आंदोलनात सहभागी झालो नाही!


भाजपने ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाल्याच्या विरोधात राज्यभर आंदोलन केले. आपण युतीत असतानाही आंदोलन का केले नाही असं विचारलं असता जानकर म्हणाले, 'भाजपचे लोक त्यांच्या पक्षाच्या बॅनरखाली आंदोलन करत होते. मी माझ्या पक्षाकडून आंदोलन करणार आहे. त्यामुळं मी भाजपच्या आंदोलनात सहभागी झालो नाही.'

पडळकर माझ्या पक्षात नाहीत!

सोलापुरात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर  यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावर विचारला असता जानकर यांनी त्यांच्यावर बोलणं टाळलं. ' भाजपच्या आमदाराबद्दलचा प्रश्न त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना विचारा. पडळकर माझ्या पक्षात नाहीत. आमचा पक्ष हा भाजपचा मित्र आहे. मी ओबीसीच्या आंदोलनाच्या संदर्भात भूमिका मांडण्यासाठी इथं आलो आहे. पडळकरांवर बोलून त्यांना मोठं का करू,' असा टोलाही जानकर यांनी हाणला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या